आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS च्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का:नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झालेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेल्या नागो गाणार यांचा सात हजार मतांच्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय असणाऱ्या नागपूरमध्ये झालेला पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. भाजपला बालेकिल्ल्यात हा दणका बसला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर नागपूरमधल्या पराभवाचे विश्लेषण करू, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

भाजपसाठी प्रतिष्ठेची जागा

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भाजपचा पाठिंबा घेऊन लढणारे उमेदवार नागो गाणार यांना धूळ चारली. गाणार हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. अडबाले यांना 16500 मते मिळाली, तर गाणार यांना 6366 मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत अडबाले यांना 14071 मते मिळाली. तर गाणार 6309 मतांवर राहिले. अडबाले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला.

असेही महत्त्व

भाजपची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरचे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही याच भागातले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचे. तरीही या ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. विशेष म्हणजे गाणार यांच्यासाठी गडकरी, फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. मात्र, त्यात विजय मिळवणे पक्षाला जमले नाही.

अशी झाली लढत

नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत भाजप समर्थक नागो गाणार आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यात झाली. अडबाले यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करणारे सतीश ईटकेलवारही रिंगणात होते. मात्र, बंडखोरी केल्यामुळे ईटकेलवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली होती. या अटीतटीच्या लढतीमध्ये अडबाले यांनी गाणार यांच्यावर जवळपास सात हजार मतांनी विजय मिळवला आहे.

कोकणची भाजपला साथ

कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाजी मारली आहे. येथे 8 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्यात झाली. पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. येथे म्हात्रे यांनी बाजी मारली. इतर उमेदवारांमध्ये धनाजी नानासाहेब पाटील, जनता दल (युनायटेड ), उस्मान इब्राहिम रोहेकर (अपक्ष), तुषार वसंतराव भालेराव (अपक्ष), देवरुखकर रमेश नामदेव (अपक्ष), प्रा.सोनवणे राजेश संभाजी (अपक्ष), संतोष मोतीराम डामसे रिंगणात होते.

बातम्या आणखी आहेत...