आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाच्या मोहात गाठले नागपूर:'तो' करुन देणार होता 25 लाखांचे सव्वा कोटी! विश्वासाला तडा, फसवणूक प्रकरणात एका संशयिताला अटक

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२५ लाखांचे सव्वा कोटी करून देताे म्हणून फसवणूक केल्याची घटना नागपुरात घडली. या प्रकरणी एक संशयित आराेपीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात फिर्यादी स्वत:हून पत्ता काढून मध्यप्रदेशातून नागपुरात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी आकाश प्रमोद उमरे (वय २७, लांजी, बालाघाट) याला त्याचे मित्र व नातेवाईकांमार्फत नागपूर येथे मोहोड नावाची व्यक्ती पैसे दामदुप्पट करून देतो अशी माहिती मिळाली. त्या नंतर फिर्यादी आकाश प्रमोद उमरे त्याच्या एका मित्रासोबत नागपूर येथे आला. येथे त्याने नागपुरातील पुनम चेम्बर येथे पराग मोहोड व त्याची साथीदार कंचन गोसावी यांची भेट घेतली. आरोपींनी त्याला दोन दिवसांत २५ लाखांचे सव्वा कोटी देण्याचे आमिष दाखवले.

दोघांवर विश्वास ठेवून फिर्यादी आकाश प्रमोद उमरे नागपुरात आला असता आरोपी पराग मोहोड याने त्याची भेट नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिलाल एंजरप्रायजेस येथे आरोपी परवेज पटेल (वय ४०) याच्याशी करून दिली. पटेल याने दोन दिवसांत २५ लाखांचे सव्वाकोटी देण्याची खात्री दिली. त्या नंतर उमरेने पराग मोहोड व कंचन गोसावी यांच्या समक्ष परवेज पटेल याला २५ लाख रूपये दिले. दोन दिवसानंतर पैसे परत मिळतील असे पटेल याने सांगितले.

दोन दिवसानंतर उमरेने मोहोडला फोन केला असता पैसे मिळाले नाही असे सांगून टाळाटाळ केली. त्या नंतर उमरेने नागपूर गाठत परवेज पटेल याची कार्यालयात भेट घेतली असता त्याने पुन्हा आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उमरेने नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून भादंवि कलम ४२०, ४०६, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपी पराग मोहोड याला अटक केली आहे.