आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात खळबळ:रात्री तरुणाचा खून, सकाळी जमावाचा गुंडाला बेदम चोप; मृताला बलात्कार प्रकरणात अडकवले होते

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात सिनेस्टाइलने “खून का बदला खून’ म्हणत रात्री झालेल्या खुनात सहभाग असलेल्या कुख्यात गुंडाला रविवारी सकाळी जमावाने जीवघेणी मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी रात्री अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्यानगर येथे स्वयंदीप नगराळे (२१) या युवकाचा खून करण्यात आला. या खुनात सहभागी कुख्यात गुंड शिवम ऊर्फ शक्तिमान शुद्धोधन गुरुदेव याला स्वयंदीपचे मित्र आणि परिसरातील लोकांनी बेदम मारहाण केल्याने खळबळ माजली आहे. गरीब कुटुंबातील असलेला स्वयंदीप वडिलांना व्यवसायात मदत करत होता. शक्तिमानने कौशल्यानगर परिसरात स्वत:ची वेगळी गँग स्थापन करून दहशत निर्माण केली होती. या परिसरात असलेला जुगाराचा अड्डा या हत्याकांडाचे कारण असल्याचे सांगितले जाते.

कौशल्यानगर परिसरात संजय उमाळे याचा जुगाराचा अड्डा चालतो. याच अड्ड्यावरून काही दिवसांपूर्वी स्वयंदीप नगराळेसोबत वाद झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम ऊर्फ शक्तिमान शुद्धोधन गुरुदेव याने स्वयंदीपला बलात्काराच्या आरोपात अडकवले होते. तेव्हापासून त्यांच्यात कुरबुरी सुरू होत्या. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास स्वयंदीप जेवण करून बाहेर निघाला. त्या वेळी प्रकाश कावरे याच्या घरासमोर ठेवलेल्या आॅटोमध्ये निशांत अरविंद घोडेस्वार (१९), शक्तिमान व दोन अल्पवयीन आरोपी बसले होते. तिथून जाणाऱ्या स्वयंदीपला आवाज देऊन त्यांनी बोलावले व त्याच्याशी जुन्या भांडणावरून वाद उकरून काढत पोटात चाकू मारून त्याचा खून केला. स्वयंदीपचे वडील सत्यप्रकाश यांनी दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेदम मारहाण केल्याने खून करणारा गुंड व्हेंटिलेटरवर
स्वयंदीपच्या खुनाची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी दोन अल्पवयीन आराेपींसह अन्य एका आरोपीला रात्रीच अटक केली. मात्र मुख्य आरोपी शक्तिमान फरार होता. इकडे स्वयंदीपच्या मित्रांनी शक्तिमानचा रात्रभर शोध घेऊनही तो सापडला नाही. लोकांच्या मनात सुडाची भावना होती. वस्तीतील प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, रात्री स्वयंदीपची हत्या केल्यानंतर शनिवारी सकाळी शक्तिमान आपली दहशत कायम करण्यासाठी वस्तीत आला होता. त्याला पाहून भडकलेल्या वस्तीतील लोकांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करीत बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. शक्तिमान मेला असे समजून स्वयंदीपचे मित्र निघून गेले. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला दवाखान्यात भरती केले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून तो व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एस. के. जाधव यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...