आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान:नागपुरात 19 वर्षांनी नोंदले गेले सर्वाधिक 46.2 अंश तापमान ; 2003 नंतर प्रथमच उच्चांकी तापमान

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणत: एप्रिल व मे हे दोन महिने तापदायक ठरतात. पण, येथे जून तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. १९ वर्षांनंतर म्हणजे २००३ नंतर प्रथमच नागपुरात शुक्रवार, ३ जून रोजी ४६.२ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार हे जूनमधील गेल्या दशकातील सर्वाधिक तापमान आहे. यापूर्वी ५ जून २०१३ रोजी ४७.७ अंश सेल्सियस हे सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले होते. ४७.९ अंश सेल्सियस हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान २३ मे २०१३ रोजी नोंदवण्यात आले आहे. राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस कोसळत असताना विदर्भात त्यातही पूर्व विदर्भात सूर्य कोपत आहे. सूर्याच्या प्रकोपामुळे विदर्भात उष्णतेची लाट आली असून लाटेत विदर्भ होरपळून निघत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही विदर्भ तापलेला आहे. २ जून रोजीही नागपूर, चंद्रपूरसह वर्धा येथे ४५ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली होती. उन्हामुळे ऐन जूनमध्ये दुपारचे बाहेर निघणे बंद केले आहे. कोरड्या आणि दमट हवेमुळे आधीच असह्य उकाडा आहे. त्यात उन्हाची भर पडली आहे. प्रादेशिक हवामान खात्याच्या माहितीनुसार नागपूर ४६.२, अकोला ४३.६, अमरावती ४४.४, बुलडाणा ३९.२, ब्रह्मपुरी ४६.१, चंद्रपूर ४६.४, गडचिरोली ४४.२, गोंदिया ४५.४, वर्धा ४५.२, वाशीम ४१.५, यवतमाळ ४३.२ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघण्याचे टाळावे

नागपूरसह विदर्भातील इतर शहरातील तापमान ४३ ते ४५ अंशांदरम्यान असल्यामुळे उष्माघाताचा धोका जास्त संभावतो. नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघण्याचे टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमित पिणे, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा, असेही आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. नागपुरात तापमान वाढल्यानंतर नागरिकांना उन्हापासून असा बचाव करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...