आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये नागपूर अव्वल:राज्यात आतापर्यंत 4 लाख 33 हजार नागरिकांचे लसीकरण

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे संकट दुर करण्यासाठी शासनातर्फे बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले व त्यासाठी विशेष मोहिम सुद्धा राबवण्यात आली. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूर महानगरपालिकेद्वारे बुस्टर डोससाठी अभियान राबवले. राज्यात नागपूरमध्ये बुस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. शहरातील 4 लाख 33 हजार 121 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

केंद्र शासनाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने 15 ऑगस्टपर्यंत बुस्टर डोससाठी विशेष मोहिम राबविली. मनपाद्वारे 18 वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या नि:शुल्क लसीकरणामध्ये ‘हर घर दस्तक’ मोहिम सुद्धा राबवण्यात आली. पात्र सर्व व्यक्तींना घरी जाउन बुस्टर डोस देण्यात आले. याशिवाय शहरात लसीकरण केंद्रांचीही संख्या वाढविण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 दिवस चाललेल्या विशेष लसीकरण मोहिमेच्या सुरूवातीच्या 15 दिवसातच नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 15 दिवसात 1 लाखावर नागपूरकरांनी बुस्टर डोस घेतला. पुढे या मोहिमेला नागरिकांनी अधिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला.

नागपूर जिल्हयाची लोकसंख्या 50,95,405 आहे. यापैकी सर्व वयोगटातील 30,86,285 नागरिक बुस्टर डोससाठी पात्र ठरले आहेत. या पात्र व्यक्तींपैकी 19 ऑगस्ट 2022 पर्यंतच्या प्राप्त आकडेवारीनुसार 4 लाख 33 हजार 121 पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. हे प्रमाण 14.3 टक्के एवढे आहे. विशेष म्हणजे, नागपूर शहराचा विचार करता 17,72,049 पात्र व्यक्तींपैकी 3,11,689 नागरिकांनी बुस्टर डोस घेतलेला आहे. हे प्रमाण 17.58 टक्के एवढे आहे. नागपूर जिल्हयाने बुस्टर डोसमध्ये राज्याची राजधानी मुंबईला सुद्धा मागे टाकले आहे. मुंबईचे बुस्टर डोसचे प्रमाण 13.57 टक्के एवढे आहे. तर पालघर (12.4 टक्के) तिसऱ्या स्थानी आहे.

आता कोर्बेव्हॅक्सचे सुद्धा बुस्टर डोस

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन नंतर आता कोर्बेव्हॅक्स लसीचे सुद्धा बुस्टर डोस घेता येणार आहे. विशेष म्हणजे, कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड यापैकी कुठल्या एका लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या 18 वर्षावरील नागरिकांना कोर्बेव्हॅक्सचे बुस्टर डोस घेता येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाद्वारे पत्र जारी करण्यात आले आहे. आतापर्यंत 12 ते 15 या वयोगटातील मुलांनाच कोव्हिड प्रतिबंधात्मक लस म्हणून कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस दिले जात होते.

बातम्या आणखी आहेत...