आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यल्प प्रतिसाद:रातुम नागपूर विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत 22.97 टक्के मतदान, केंद्र दुसरीकडे दिल्याने टक्केवारीवर परिणाम

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातील दहा जागांकरिता रविवारी शांततेत मतदान पार पडले. विद्यापीठ परिक्षेत्रातील १०२ मतदान केंद्रांवर रविवार, १९ मार्च २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रांवरून भ्रमणध्वनीद्वारे घेतलेल्या माहितीच्या आधारे सरासरी २२.९७ टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात मंगळवार २१ मार्च २०२३ रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळी ८ वाजतापासून मतदान सुरू झाले. मात्र, मतदानाला अत्यल्प प्रतिसाद होता. अनेक मतदारांचे मतदान केंद्र त्यांच्या रहिवासी पत्ता नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये गेल्याने याचा फटका निवडणुकीवर बसल्याचे चित्र आहे.

पदवीधरच्या १० जागांकरिता या ५१ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीमध्ये ६० हजार ३७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. विद्यापीठ परिक्षेत्रातील नागपूर शहरात सर्वाधिक ३५ मतदान केंद्र असून नागपूर जिल्ह्यामध्ये २२, भंडारा जिल्ह्यामध्ये २१, गोंदिया जिल्ह्यामध्ये ११ तर वर्धा जिल्ह्यात १३ असे एकूण १०२ मतदान केंद्र संलग्नित महाविद्यालयांमध्ये निश्चित करण्यात आली. मात्र, मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते.

मतदान केंद्रात आल्यावर आपले मतदान दुसऱ्याच जिल्ह्यात असल्याचे माहिती झाल्याने मतदारांचा हिरमोड झाला. नोव्हेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत त्यांचे केंद्र नागपूर होते आता त्यांचे केंद्र भंडारा, देवरी, लाखांदूर असे देण्यात आले आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे चित्र होते. अनेक मतदारांनी विद्यापीठाच्या ग्रुपवर या संबंधीच्या तक्रारी केल्या.