आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात सभा होणारच:महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवरून भाजप-काँग्रेसमध्ये संघर्ष, काँग्रेसने केली मैदानाची पाहणी

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेवरून भाजप-काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. भाजपने सभेस विरोध नसल्याचे सांगितले असले तरी भाजपच्याच आमदार कृष्णा खोपडे यांचा सभेला विरोध कायम आहे. या विरोधाला न जुमानता आज दुपारी सभेचे मुख्य संयोजक सुनील केदार यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी मैदानाची पाहणी करत सभा होणार असल्याचे स्पष्ट केले.

नागपूरला 'वज्रमूठ' होणारच!

काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी गरज भासल्यास आमदार निधीतून मैदान चांगले करून देऊ असे सांगितले. या भागात सभेला कोणाचाही विराेध नाही. उलट उद्धव ठाकरे, अजित पवार आदींना ऐकण्यास लोक उत्सुक असल्याने सभा होईलच, असे ठणकावून सांगितले.

भाजपच्या स्थानिक नेत्याचा वाढता विरोध असताना काँग्रेसच्या नेत्यांनी दर्शन कॉलनीच्या मैदानावर वज्रमूठ सभेसाठी सुरू करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. नागपुरातील वज्रमूठ सभेची जबाबदारी असलेले माजी मंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नेत्यांनी मैदानावर पाहणी केली.

मविआचे प्रत्युत्तर

आमच्या सभेला स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याचे सांगितले जात असले, तरी आम्हाला कुठेही विरोध दिसत नाही. काही अटी शर्तींसह आम्हाला नागपूर सुधार प्रन्यासने मैदानावर राजकीय सभेची परवानगी दिली आहे. आम्ही त्या अटी शर्तींचे पालन करू. आम्ही व्यासपीठ उभारण्यासाठी मैदानावर खड्डेही खोदत नाही. मैदानाचे नुकसान होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ असे संयोजक सुनील केदार यांनी सांगितले.

कोणतीही राजकीय सभा जमिनीवरच होऊ शकते. हवेत होऊ शकत नाही. त्यामुळे राजकीय सभा घ्यायची असल्यास कुठले तरी मैदान घ्यावेच लागेल, अशा शब्दांत महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांनी भाजपला चोख उत्तर दिले.

माघार घेण्यास तयार नाही

महाविकास आघाडीची नागपूरला 16 एप्रिलला सभा आहे. सभेच्या मैदानावरून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सभेला विरोध केला आहे. मात्र, खोपडे यांचा विरोध म्हणजे भाजपचा विरोध असे चित्र लोकांपुढे जात असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी भाजपचा सभेला विरोध नाही असे स्पष्ट केले. पण दुसरीकडे खोपडे माघार घेण्यास तयार नाही. त्यांनी ज्या भागात सभा होणार आहे. त्या भागातील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन सुरू केले आहे.