आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, लोकांची बेफिकिरी आणि प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे नागपुरात कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि रुग्णसंख्या वाढत आहे. समन्वय आणि सुसंवादाचा अभाव असल्याने कुणाचा पायपाेस कुणाच्या पायात नसल्याचे चित्र आहे. २७ ते ३० मार्च या चार दिवसांत नागपुरात २११ मृत्यू व १५,९४६ रुग्ण वाढले आहेत. त्यातच स्मशानभूमीच्या क्षमतेनुसार मृतदेह पाठवण्यात येत नसल्यामुळे कुठे खूप गर्दी तर कुठे प्रतीक्षा असे चित्र आहे. २२ मार्चपासून मृत्यू आणि रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. २२ मार्च रोजी ४० मृत्यू आणि ४६६४ रुग्णांची नोंद झाली. वाढते मृत्यू आणि रुग्णसंख्या प्रशासनाची चिंता वाढवणारे आहेत. मेयो, मेडिकलवर सर्वाधिक भार आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारे किंग कोब्रा स्वयंसेवी संस्थेचे अरविंद रतुडी यांनी ऑगस्ट २०२० पेक्षाही अंत्यसंस्काराची परिस्थिती बिकट झाल्याचे सांगितले. काेरोनामुळे कुणी गेला तर शववाहिका येण्यासाठी पाच ते सहा तास लागत आहे. आर्थिक फायद्यासाठी महापालिका कर्मचारी खासगी रुग्णालयांत आधी जातात, असा स्पष्ट आरोप रतुडी यांनी केला.
अंबाझरी घाट (११ ओटे), मोक्षधाम (२२ ओटे), सहकारनगर (४ ओटे), मानेवाडा (१४ ओटे), मानकापूर (७ ओटे) आणि गंगाबाई घाट येथे (२५ ओटे) येथे तुराटी व पऱ्हाटीच्या काड्या म्हणजे मोक्षकाष्ठ वापरले जातात. सध्या कोरोना व नैसर्गिक मृत्यूचे मिळून १०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. परंतु मृतदेहांच्या असमान वितरणामुळे काही घाटांवर खूप गर्दी होत आहे, तर काही घाट रिकामे राहत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय लिमये यांनी दिली. स्मशानभूमीतील ओट्यांच्या संख्येनुसार रुग्णालयांनी मृतदेह पाठवल्यास एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, असे लिमये यांनी स्पष्ट केले. या सर्व घाटांवर मोक्षकाष्ठाद्वारे अंत्यसंस्कार केले जातात. २५० किलो मोक्षकाष्ठ एका मृतदेहासाठी लागतात. ते नि:शुल्क दिले जातात, असे लिमये यांनी सांगितले. मानेवाडा घाटावर २९ रोजी १८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.