आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे लोक दररोज महापुरुषांचा अपमान करतच आहे. आज पुन्हा एकदा महापुरुषांचा अपमान केला गेला. महात्मा गांधी हे जुने राष्ट्रपिता आता नरेंद्र मोदी नवे राष्ट्रपिता आहेत असे म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला आहे पण या देशाचे राष्ट्रपिता एकच आहेत आणि ते महात्मा गांधीच. त्यांच्याशिवाय इतर कुणाची ती पात्रता नाही, असा सणसणीत टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
लोकांना जुनाच भारत हवाय
प्रसार माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काही लोकांना नवीन भारत हवा आहे, या नव्या भारतात लोकशाही, संविधान धाब्यावर बसवून काही मुठभर लोकांच्या हाती सर्व आर्थिक व्यवहार देण्यात आले आहेत पण लोकांना मात्र जुनाच भारत पाहिजे, नवीन भारत नकोच आहे. या नव्या भारतात कोणी स्वतःची पाठ थोपटून घेत असेल तर त्यांनी ती थोपटून घ्यावी.
जनता त्यांना धडा शिकवेल
नाना पटोले म्हणाले, काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुने आदर्श झाले आता नवीन आदर्श नितीन गडकरी आहेत, असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला होता. आता काही लोकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी जुने राष्ट्रपिता झाले नरेंद्र मोदी नवे राष्ट्रपिता आहेत असे म्हणून अपमान केला. राष्ट्रपिता व महापुरुषांचा अपमान करू नका अशीच आमची विनंती आहे, जे असा प्रयत्न करतील त्यांना जनताच धडा शिकवेल.
बदनामी करण्यात भाजप आघाडीवर
नाना पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी निगडीत काही लोक जाणीवपूर्वक महापुरुष व आमच्या दैवतांचा अपमान करत आहेत. भाजपचे मंत्री यात आघाडीवर आहेत. हा चुकीचा पायंडा पाडला जात असून हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. महापुरुषांचा अपमान करून त्यांच्या महान कार्याचा अपमान करणे योग्य नाही. महापुरुषांचा अपमान करुन त्यांचा मोठेपण कमी होत नाही पण अशा प्रकारचा खोडसाळपणा थांबवला पाहिजे, असेही पटोले म्हणाले.
अजून माफी मागितलेली नाही
नाना पटोले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा अपमान भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक करीत आहे. या प्रकरणी भाजप नेत्यांनी अजून माफी मागितलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.