आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय गिधाड संवर्धन दिवस:निसर्गातील ‘स्वच्छता दूत’ गिधाड नामशेष होण्याच्या मार्गावर

गडचिरोली / हेमंत डोर्लीकर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामायणातील सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी दोन हात केलेला “जटायू’ गिधाड आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अनेकांना कुरूप वाटणारा गिधाड हा निसर्ग स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. कारण पक्षी जमातींमध्ये निसर्गाचा ‘स्वच्छता दूत’ म्हणून त्याची ओळख आहे. महाराष्ट्रात सध्या गिधाड दिसणे म्हणजे दुर्मिळ घटना होऊन बसली आहे. महाराष्ट्रात नोंद झालेल्या ५८० पेक्षा अधिक पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. त्यामध्ये गिधाडांचाही समावेश आहे. निसर्गात ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळख असणारे गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात वन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही अवस्था ओढवली असल्याचे या क्षेत्रातील संशोधक, अभ्यासक, गिधाड मित्र आणि वन्यजीव क्षेत्रातील डॉ. अजय पोहरकर यांचे म्हणणे आहे.

ज्याप्रमाणे सागरी कासवांना समुद्राचे स्वच्छता कर्मचारी म्हटले जाते तसेच जमिनीवरील ‘स्वच्छता दूत’ म्हणजे गिधाड. अन्नसाखळी ही एकमेकांवर अवलंबून आहे. यातील एकही घटक निखळला तर अन्नसाखळी ढासळण्याची शक्यता असते. गिधाडही या अन्नसाखळीतील दुसऱ्या जीवांवर अवलंबून असणारा पक्षी आहे. कारण ते केवळ मेलेल्या प्राण्यांच्या मृतदेहांवर उदरभरण करतात. म्हणून त्यांना ‘मृतभक्षक’ म्हणतात. जगभरात गिधाडांच्या २३ प्रजाती आढळतात. त्यापैकी भारतात ‘बीअर्डेड’, ‘सीनरस’, ‘इजिप्शियन’, ‘युरेशियन’, ‘हिमालयीन ग्रिफॉन’, ‘लाँग बिल्ड’, ‘रेड हेडेड’, ‘स्लेंडर बिल्ड’, ‘ओरिएंटल व्हाइट बॅक व्हल्चर’ या नऊ प्रजाती सापडतात. गरुडापेक्षा गिधाड हा पक्षी आकाराने मोठा आणि ताकदवान असतो तरीदेखील गिधाड शिकार करत नाही. त्यामुळे त्याचा समावेश गरुड, ससाणा आणि घारीसारख्या शिकारी पक्ष्यांच्या यादीत होत नाही. महाराष्ट्रातील परिस्थिती: महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद झाली असली तरी भारतीय, पांढऱ्या पुठ्ठ्याची, लांब चोचीची, हिमालयीन ग्रिफॉन आणि पांढरी गिधाडे प्रामुख्याने आढळतात. १९९० पूर्वी राज्यात गिधाडे खूप मोठ्या संख्येने आढळत होती. मात्र, ‘डायक्लोफेनॅक’ या औषधामुळे देशभरात गिधाडांची संख्या कमालीची कमी झाली. त्यामुळे महाराष्ट्रात गिधाडे दिसेनाशी झाली आहेत. गुरांच्या उपचारांसाठी उपयोगात आणले जाणारे ‘डायक्लोफेनॅक’ नावाचे वेदनाशामक औषध गिधाडांसाठी विष ठरले आहे. हे वेदनाशामक औषध मृत जनावराच्या कलेवरातून गिधाडांच्या शरीरात पोहोचते. या औषधामुळे गिधाडे मरत आहेत हे सिद्ध होऊन शासन दरबारी ते पोहोचेपर्यंत देशातील अंदाजे ९९ टक्के गिधाडे संपून गेली. गडचिरोली जिल्ह्यात निमगाव, धानोरा, रांगी, कुनघाडा, दूधमळा लेखा मेंढा मोहली, येडनपायली या भागात ८ ते १० वर्षांपूर्वी पांढऱ्या पाठीच्या, लांब चोचीच्या गिधाडांची संख्या मोठी होती. केवळ येडनपायली येथेच १०० पेक्षा अधिक गिधाडांचे वास्तव्य होते असे स्थानिक राजू वड्डे यांनी सांगितले.

अन्न मिळाले नाही, प्रतिकारशक्ती कमी होऊन मलेरियाने गिधाडांचा मृत्यू
डॉ. अजय पोहरकर हे विदर्भातील पशुवैद्यकीय चिकित्सक असून गिधाड या पक्षी प्रजातीचे संशोधक आणि संवर्धक आहेत. ते गेल्या १० वर्षांपासून नावार या संस्थेच्या माध्यमातून गिधाड संवर्धनाचे काम करीत आहेत. त्यांच्या मते गिधाडांची संख्या कमी होण्याचे मूळ कारण डायक्लोफेनॅक हे नसून गिधाडांना खाद्यान्नाची कमी झाल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली व ते मलेरियासारख्या आजाराचे बळी ठरले. खाद्यान्न उपलब्ध न होण्यासाठी कत्तलखाने जबाबदार असल्याचे त्यांचे आकलन आहे. जिवंत जनावरे कत्तलखान्यात जातात. त्यामुळे जनावरांचा नैसर्गिक मृत्यू थांबला. परिणामी गिधाडांचे नैसर्गिक खाद्य संपुष्टात आले.

बातम्या आणखी आहेत...