आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांची सरकारवर टीका:कोणाचे मंत्री किती होते या वादापेक्षा आधी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा!

नागपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीतही सुरूवातीला केवळ पाचच मंत्री होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आमचे पाच नव्हते सात होते. पण, कोणाचे किती मंत्री होते यापेक्षा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर मदत कशी मिळेल हे सरकारने पाहावे असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. तसेच मदतीच्या केवळ घोषणा वा सहानुभूती नव्हे तर प्रत्यक्ष मदत हवी आहे. असेही ते म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील जनतेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अजित पवार यांनी केली होती. राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.

अजूनही पंचनामे नाही

वर्धा आणि यवतमाळच्या दौऱ्यापूर्वी पवार म्हणाले, ​​​​​मी मुख्यमंत्र्यांना भेटून याआधी काही प्रश्न मांडले होते. माझ्या दौऱ्यात दिसणारे चित्र आणि वस्तुस्थिती मी त्यांना सांगणार आहे. अधिवेशनातही हा प्रश्न लावून धरणार आहे. या क्षणी मदतीच्या केवळ घोषणा वा सहानुभूती नव्हे तर प्रत्यक्ष मदत हवी आहे. अजूनही पंचनामे झाले नाही, ही वास्तविकता आहे. दोन जणांचे मंत्रिमंडळ आहे. परिणामी निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना मदतीसाठी वेळ लागत असल्याचे पवार म्हणाले.

नुकसानग्रस्त शेतकरी वंचित

दौरा करून स्वत: पाहाणी केल्यावर वस्तुस्थिती कळते. शेत पिकांचे किती नुकसान झाले, घरांची पडझड झाली, जनावरांचा मृत्यू झाला. त्या नंतरही मदत मिळाला नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केला असला तरी पूरग्रस्त भागाचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

मंत्रिमंडळ नसल्याचा फटका

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून काम केल्याने काहीही होणार नाही. मंत्रिमंडळ स्थापन करून 37 जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देणे, त्यांना जिल्ह्यात ठाण मांडून बसा असे सांगायला हवे. परंतु, मंत्रिमंडळच अस्तित्वात नसल्याने पूरग्रस्तांसह सामान्य जनतेला त्याचा फटका बसला आहे, अशी टीका पवार यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...