आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअब्जावधी वर्षांपूर्वी सूर्याची निर्मिती कशी झाली, एकदिवस या प्रचंड ताऱ्यामुळे पृथ्वीचा नाश कसा होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा खेळ नागपूर येथील रामन विज्ञान केंद्रातील तारांगणात उद्या शनिवार 18 जूनपासून सुरू होत आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत निवेदन असलेला खेळ दररोज दुपारी 1 वाजता, 2, 3, 4 आणि सायंकाळी 5 वाजता होईल. "द सन अवर लिव्हिंग स्टार' असे या खेळाचे नाव आहे.
सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्रापासून 25,000 ते 28,000 प्रकाशवर्षे दूर असून आकाशगंगेच्या केंद्राला प्रदक्षिणा घालत असतो. एक प्रदक्षिणा सुमारे 22.5 ते 25 कोटी वर्षांनी पूर्ण होते. त्याचा प्रदक्षिणेतील वेग सेकंदाला 220 किलोमीटर इतका आहे, म्हणजेच 1400 वर्षांमध्ये तो एक प्रकाशवर्ष अंतर पार करतो.
सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ (ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी 99% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.
सूर्याचे सध्याचे वय हे 460 कोटी वर्षे
सूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे 74% हायड्रोजन, 25% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. सूर्याचे सध्याचे वय हे 460 कोटी वर्षे इतके असून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे. सूर्याच्या गाभ्यामधील हायड्रोजन अणू-संमीलन प्रक्रियेद्वारे हेलियममध्ये परिवर्तित होत असतो. दर सेकंदाला 4 दशलक्ष टन वस्तुमान हे सूर्याच्या गाभ्यामध्ये ऊर्जेत परिवर्तित होते तसेच न्यूट्रिनो कण आणि सौरकिरणोत्सर्ग हेसुद्धा तयार होतात. 500 कोटी वर्षांनी सूर्य एका राक्षसी ताऱ्यामध्ये रूपांतरित होईल त्यानंतर प्लॅनेटरी नेब्यूला तयार होईल व श्वेत बटू (White Dwarf) ही शेवटची अवस्था असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.