आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक अंदाज:चंद्रपुरात पडलेल्या वस्तू न्यूझीलंडचा ब्लॅक स्काय उपग्रह ? स्काय वॉच ग्रुपच्या टीमने घटनास्थळी जाऊन केली पाहणी, अहवाल देणार

चंद्रपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, २ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.४५ वाजता आकाशात मोठ्या उल्का पडल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु त्या वस्तू उल्का नसून उपग्रहाचे किंवा राॅकेटचे तुकडे आहेत, असा प्राथमिक अंदाज स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला आहे. स्काय वॉच ग्रुपच्या टीमने रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील वस्तू कोसळलेल्या गावात जाऊन पाहणी केली असता हा निष्कर्ष काढला. या टीमने शनिवारी पडलेली रिंग आणि रविवारी आढळलेली गोल वस्तू या न्यूझीलंडच्या ब्लॅक स्काय उपग्रह सोडण्यासाठी वापरले जाणारे रॉकेटचे अवशेष आहेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.

शनिवारी अनेक लोकांनी रात्री ७.४५ वाजता अवकाशातून आगीचे गोळे पडताना पाहिले होते. बहुतेक जण याला उल्कावर्षाव समजत होते. परंतु स्काय वॉच ग्रुपतर्फे हे तुकडे उपग्रहाचे किंवा रॉकेटचे आहेत असा अंदाज व्यक्त केला होता. कारण शनिवारी न्यूझीलंडचे ब्लॅक स्काय नावाचा उपग्रह संध्याकाळी ६.१० ला सोडण्यात आला होता. ती वेळ आणि मार्ग पाहता हे त्याच रॉकेटचे तुकडे असावेत असा अंदाज आहे. चीनचेसुद्धा एक रॉकेट पडणार असल्याचे बोलले जात होते. परंतु त्याची शक्यता वाटत नाही, असे चोपणे यांनी स्पष्ट केले.

या वस्तूंची पाहणी करण्यासाठी ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे तसेच सदस्य प्रा. सचिन वझलवार आणि प्रा. योगेश दुधपचारे सिंदेवाही येथे गेले. वस्तूंची पाहणी केली असता तिथे लाडबोरी या खेड्यात पडलेला रॉकेटचा बाह्य पत्रा आणि पवनपारजवळ एक गोल आकाराचा हायड्रोजन स्पिअर हा इंधन दाब नियंत्रण करणारा गोल सिलिंडर आढळला. अजूनही काही वस्तू परिसरात आढळण्याची शक्यता आहे. निरीक्षणावरून या अवकाशीय वस्तू रॉकेटच्याच असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे.

रिंग १० बाय १० फूट
ही गोल रिंग १० बाय १० फूट व्यास, ८ इंच रुंद आणि ४० किलोची आहे, तर दुसरी गोल वस्तू रॉकेटचाच एक भाग असून ती २ फूट व्यासाची आढळली. अजून काही वस्तू परिसरात मिळण्याची शक्यता आहे. ग्रुपतर्फे लाडबोरी खेड्यातील लोकांशी चर्चा केली. तहसील आणि जिल्हा प्रशासन परिसरातील सर्व संभाव्य वस्तू गोळा करून सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्धा| रविवारी सकाळी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा व धामणगाव शिवारातील शेतात अवकाशातून पडलेले यंत्राचे अवशेष आढळून आले. नागरिकांची गर्दी होताच ते अवशेष समुद्रपूर आणि गिरड पोलिसांनी ताब्यात घेत नागरिकांकडू माहिती जाणून घेतली. वाघेडा शिवारात नितीन सोरते हे सकाळी शेतात गेले असता त्यांना एक सिलिंडरसारखी आकृती असणारी काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेली अंदाजे ३ ते ४ किलो वजनाची वस्तू आढळून आली.
वर्धा जिल्ह्यात समुद्रपूरच्या दोन गावांत पडले अवशेष

बातम्या आणखी आहेत...