आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सरकार म्हणजे खट्या (बिनकामाचा) बैल आहे. तुतारी टोचल्याशिवाय चालत नाही. थोडीशी तुतारी काढली की ते थांबते. अशा सरकारला तुतारी टोचण्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी विधान परिषदेत पाठवा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या पदवीधर निवडणूक मेळाव्यात बोलताना केले. मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पूर्व विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
ब्राॅडगेज मेट्रो मंजूर करण्यासाठी एक वर्ष लागले. त्यासाठी उद्धव ठाकरेंपासून अजितदादांपर्यंत अनेकांना फोन करावे लागले. आता प्रकल्प मंजूर झाल्यानंतर श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येत आहे. विधान परिषदेचा उपयोग विदर्भाचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप चांगल्या रितीने करता येतो, असे गडकरी म्हणाले.
मायावी विरोधकांचे कृत्य हाणून पाडा; सुधीर मुनगंटीवार : पदवीधर निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विरोधकांनी समाज माध्यमांवरुन मायावी रुपात अपप्रचार करणे प्रारंभ केले आहे. रावणासारख्या मायावी राक्षसाचा पराभव झालेला आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे, विरोधकांचे जातीयवादी कारस्थान आणि समाज माध्यमांवरील मायावी कृत्य कार्यकर्त्यांनी आपल्या परिश्रमाने हाणून पाडावे असे आवाहन माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यातील सरकारचे रुप एका वर्षात पालटले असून महाविकास आघाडी आता महाविनाश आघाडी बनली असून येत्या काळात ती महाराष्ट्र विकावू आघाडी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांचा हा प्रवास संपविण्याची संधी आता आली असून या मतदारसंघाची परंपरा आपण कायम राखू हा विश्वास आहे पण मताधिक्य विक्रमी असावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावा असे आवाहनही सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महाविकास आघाडी विदर्भद्वेषी : फडणवीस
सध्या राज्याचा कारभार करीत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचा एकही मंत्री आपल्या सरकारची उपलब्धी सांगू शकला नाही. मुख्यमंत्र्यांनी तर केवळ धमक्या देण्याचे सत्र प्रारंभ केले. कोरोना नियंत्रणात बहुतांश राज्यांनी यश आले. पण महाराष्ट्र अजूनही चाचपडत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तीन पक्ष एकत्र आल्याने भाजपला एकटे पाडू असे या नेत्यांना वाटत आहे, पण पंतप्रधान मोदींविरोधात २४ पक्ष एकत्र आले तरीही काही फरक पडला नाही, उलट सर्वाधिक बहुमत मिळवून मोदींनी सत्ता स्थापन केली. राज्यातील विद्यमान सरकार विदर्भद्वेषी आहे असा आरोप करीत विदर्भातील सर्व कामे बंद केल्याचे फडणवीस म्हणाले.
पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावतीच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुकीचा प्रचार रविवारी सांयकाळी थंडावला. पुणे मतदारसंघाची निवडणुक भाजप आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. दुसरीकडे फडणवीस यांची आपली ताकद पणाला लागली आहे. ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.