आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:‘आणखी काही नको...’ नंदा खरेंनी नाकारला ‘साहित्य अकादमी’

नागपूर/जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ला ‘बालसाहित्य पुरस्कार’

प्रसिद्ध लेखक नंदा खरे लिखित ‘उद्या’ कादंबरीला मराठी भाषेतील सर्वोत्तम कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच प्रसिद्ध बालसाहित्यिक आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहाला साहित्य अकादमीचा ‘बालसाहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ५० हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

तथापि, नंदा खरे यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले, चार वर्षांपूर्वी मी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. समाजाकडून मला भरपूर मिळालं. पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून, आभार मानून ही भूमिका मी मांडत आहे, असे खरे म्हणाले.

शुक्रवारी माझ्या “उद्या’ या जानेवारी २०१४ मध्ये प्रकाशित कादंबरीला साहित्य अकादमी जाहीर झाल्याचे कळाले. गेली चार वर्षे लोकांना नाही म्हणत आलो. आता हो म्हटले असते तर त्यांचा अपमान झाला असता. म्हणून पुरस्कार नाकारत असल्याचे खरे यांनी सांगितले.
अशी आहे “उद्या’... : “उद्या’ ही नंदा खरे यांची भविष्याचा वेध घेणारी कादंबरी आहे. लोकसंख्येचे प्रश्न, गुंतागुंत व जगण्याच्या बिकट प्रश्नांचा वेध यात आहे.

वीरप्पा माेइली, अनामिकांचा गौरव : शुक्रवारी २० भाषांतील साहित्यास हा पुरस्कार जाहीर झाला. यात काँग्रेस नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री ए. वीरप्पा मोईली यांना कानडी साहित्यातील योगदानासाठी तर हिंदी लेखिका अनामिका यांना “टोकरी में दिगन्त’साठी, अरुंधती सुब्रह्मण्यम यांच्या इंग्रजी काव्यसंग्रहास आणि हुसेन-उल-हक यांच्या उर्दु साहित्यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

आबांवर साहित्य अकादमीची मोहोर
जळगाव | एरंडोलमध्ये सालदाराच्या घरात जन्मलेल्या आबा गोविंदा महाजन यांनी शिक्षक, नायब तहसीलदार ते तहसीलदारपदापर्यंत मजल मारली. त्यांनी बालसाहित्यात राज्य पुरस्कारांची हॅट‌्‌ट्रिक केल्यानंतर ‘आबाची गोष्ट’ या कथासंग्रहावर बालसाहित्यातील साहित्य अकादमीची मोहोर उमटली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या, जिद्दी मुलांच्या या कथांची दखल घेतल्याचे मनस्वी समाधान वाटत असल्याचे आबा महाजन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...