आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • On The Day Of The Revolution, Hundreds Of People On The Road, Stopped Cutting Trees In Wardha; The Movement Succeeded In Saving 101 Trees

दखल:क्रांतिदिनी भरपावसात दाेनशे जण रस्त्यावर, वर्धेत वृक्षताेड थांबवली; आंदोलनाने 101 झाडे वाचवण्यात यश

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा येथे बैठकीत चर्चा करताना डॉ. उल्हास जाजू, संजय इंगळे तिगावकर यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक. - Divya Marathi
वर्धा येथे बैठकीत चर्चा करताना डॉ. उल्हास जाजू, संजय इंगळे तिगावकर यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक.
  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चेतून निघाला तोडगा

विकासाच्या नावावर शहरासह सेवाग्राम आश्रम परिसरातील वृक्षांची तोड सुरू असल्याने ‘दिव्य मराठी’ने ‘गांधीजींच्या नावाने होणारी वृक्षतोड थांबवा, हीच क्रांती’ या मथळ्याखाली रविवारी वृत्त प्रकाशित केले होते. भरपावसात वृक्ष, पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या आंदोलनाचा परिणाम होऊन अखेर क्रांतिदिनी वृक्षतोड थांबवली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता वृक्ष तोडण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी राज्य शासनाने सेवाग्राम विकास आराखडा तयार केला आहे. परिसरातील रस्त्यांवर १६८ लिंबाचे मोठे वृक्ष आहेत. वर्धा शहर ते सेवाग्राम येथील रस्त्यांवर सुमारे ७० वर्षांपूर्वी लावलेले, तर बापूंनी लागवड केलेले सेवाग्राम आश्रम परिसरात वृक्ष असून आश्रम परिसर ते वरूड येथील डॉक्टर कॉलनीपर्यंत सुमारे ६७ वृक्ष आतापर्यंत तोडले आहेत. पालकमंत्री सुनील केदार यांच्याशी पर्यावरणप्रेमींनी चर्चा केली असता विकासासाठी वृक्षतोड होणार व तिथे नवीन वृक्ष लावणार असल्याचे सांगितल्याने ‘गांधीजींच्या नावाने होणारी वृक्षतोड थांबवा, हीच क्रांती’असे वृत्त दिव्य मराठीमधून प्रकाशित केले. दरम्यान, वर्धेतील पर्यावरणप्रेमींना प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने रविवार, ९ ऑगस्टला सकाळी ११ च्या सुमारास पावसाच्या सरी कोसळत असताना डोक्यावर छत्री घेऊन डॉक्टर कॉलनी येथे वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींची बैठक झाली. यात राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या भ्रमणध्वनीवर वर्धेत होणाऱ्या वृक्षतोडीबाबत शेकडो नागरिकांद्वारे माहिती पाठवण्यात आली तरीसुद्धा कंत्राटदाराने वृक्षतोड करणे सुरूच ठेवले. पर्यावरणप्रेमींचा आक्रोश वाढताच सिव्हिललाइन परिसरात होणारी वृक्षतोड थांबवण्याबाबत धाव घेतली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाकेंसह इतर शाखा अभियंत्यांना पाचारण करत शासकीय विश्रामगृहात पर्यावरणप्रेमींच्या उपस्थितीत बैठक घेतली. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता टाके यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाविषयी माहिती दिली. या बैठकीत वृक्षतोडीबाबत चर्चा करीत तोडगा काढला. चार वाजेच्या सुमारास बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पर्यावरणप्रेमींनी सेवाग्राम विकास आराखड्यात होणाऱ्या १५ मीटर सिमेंट रस्त्याची पाहणी केली. रस्त्याच्या मधोमध असलेले वृक्ष तोडणार असल्याचे टाके यांनी पर्यावरणप्रेमींना सांगितले. या वेळी डाॅ. उल्हास जाजू, करुणा फुटाणे, संजय इंगळे तिगावकर, सुषमा शर्मा, ओजस सु. वि., डाॅ. विठ्ठल साळवे, मुरलीधर बेलखोडे, डाॅ. विभा गुप्ता, डाॅ. सचिन पावडे, अशोक बंग, सुधीर पांगूळ, प्रा. किरण जाजू, प्रदीप दासगुप्ता, डाॅ. लोकेश तमगिरे, डाॅ. सोनू मोर, डाॅ. प्रणाली कोठेकर, डाॅ. सुमेध जाजू, मालती देशमुख, अद्वैत देशपांडे, सुची सिन्हा, प्रभाकर पुसदकर, डाॅ आलोक बंग, डाॅ. अनुपमा गुप्ता, दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, सचिन घोडे, दर्शन दुधाने, अतुल शर्मा, अनिल फरसोले, प्राजक्ता मुते, गुरुराज राऊत, चेतन परळीकर, रोहिणी बाबर, सुनील ढाले, विनोद साळवे, रूपाली भेदरकर, राजश्री चौधरी, नैना गोबाडे, भूमिका गुडधे, प्रगती आंबूलकर, प्रिया कोंबे, विकेश तिमांडे, वैभव फुलकरी, कार्तिक इंगळे अादींची उपस्थिती होती.

वृक्षारोपण ही दिशाभूल

७० ते ८० वर्षांपूर्वीपासून असलेली झाडे विकासाच्या नावावर तोडली जातात. हा कसला आलाय विकास? प्रशासन म्हणते, एक झाड तोडू, पण त्या बदल्यात पाच नवीन झाडे लावू. वृक्षारोपण ही संकल्पना दिशाभूल करणारी आहे. मुळातच रोपे लावली जातात, पण ती जगणार की नाही हेसुद्धा प्रशासनाला माहिती नसते. ओजस सु. वी., गोपुरी, वर्धा.

...तर "चिपको आंदोलन’

महात्मा गांधी, कस्तुरबा यांनी सेवाग्राम परिसरात वृक्ष लागवड केली होती. सुमारे ७० वर्षांपूर्वीची झाडे या रस्त्यावर आहेत. वृक्षतोड न थांबल्यास झाडे वाचवण्यासाठी चिपको आंदोलन करणार आहोत. वृक्षतोडीबाबत न्याय मागणीसाठी अॅड. असीम सरोदे यांच्यासह पर्यावरण अभ्यासकांच्या माध्यमातून याचिका दाखल करणार आहोत. संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशन, वर्धा.

इतर वृक्ष वाचवणार

१५ मीटर सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहे. वृक्ष तोडले नाही तर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या जागी नवीन वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. इतर वृक्षांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार असून दोन हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. गजानन टाके , कार्यकारी अभियंता.

बातम्या आणखी आहेत...