आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भूतदया :एकीकडे हत्तिणीला फटाक्याचे अननस देऊन मारले, दुसरीकडे डांबरात फसलेल्या कोब्राला जीवदान

चंद्रपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रपूर जिल्ह्यात डांबरात फसल्याने मरणासन्न झालेल्या कोब्रावर उपचार

एकीकडे केरळमधील पालक्कड जिल्ह्यात गर्भवती हत्तिणीला फटाके भरलेले अननस खायला देऊन ठार मारल्याची घटना घडली, तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात वितळलेल्या डांबरात फसल्याने मरणासन्न झालेल्या कोब्रावर उपचार करून त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. पशुक्रूरता आणि भूतदया या दोन घटना एका दिवसाच्या फरकाने अनुभवास आल्या. हत्तीच्या घटनेने अवघे समाजमन हेलावून गेले अाहे. अशातच अाता चंद्रपुरात काेब्रा हा मृत्यूच्या जाळ्यातून सुखरूपपणे बाहेर अाला अाहे. त्यामुळे त्याला जीवदान मिळाले. एकूणच ही परिस्थिती अधिकच गंभीर हाेती. मात्र, वेळीच मिळालेल्या मदतीमुळे त्याला जीवनदान मिळाले.

चंद्रपूर येथील इको-प्रो वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी या कोब्रा नागाला जीवदान दिले. इको-प्रोच्या वन्यजीव सदस्यांना शहरातील बिनबा गेट परिसरात एक साप अर्धमेल्या अवस्थेत अडकून पडल्याची माहिती मिळाली. संस्था सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहाणी केली असता अडकून पडलेला साप एक पूर्ण वाढीचा कोब्रा असल्याचे लक्षात आले.

रस्त्याच्या कडेला असलेल्या वितळलेल्या डांबरात अडकून कोब्रा अर्धमेला झाला होता. सदस्यांनी या कोब्रा सापाला अलगद काढून त्याला सुश्रूषा केंद्रात आणले. कोब्रा सापाला व्यवस्थित हाताळून त्याच्या अंगावर असलेले डांबर स्वच्छ केले. यानंतर या कोब्रा सापाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

चंद्रपूर शहराच्या आसपास मोठे जंगल आहे. या जंगलातून वन्यजीव अथवा सरपटणारे प्राणी शहरात येत असतात. असे प्राणी संकटात सापडल्यावर त्यांच्या बचाव करण्यासाठी इको-प्रो सदस्यांनी सतत पुढाकार घेतला आहे.

यावेळेस वितळलेल्या डांबरात अडकलेल्या कोब्रा सापाला जीवदान देत इको-प्रो सदस्यांनी मोठी कामगिरी बजावली. डांबरी रस्ता पूर्ण झाल्यावर विखुरलेले डांबर नीट साफ करण्याची गरज यानिमित्ताने दिसून येत आहे.

0