आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:सरकारमध्ये एक मुख्यमंत्री अन् अनेक सुपर मुख्यमंत्री; विरोधी पक्षनेते फडणवीस यांची वडेट्टीवारांवर टीका

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अनलॉकच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर शुक्रवारी टीका केली. ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून घोषणा करतात. केवळ श्रेयवादासाठी या मंत्र्यांनी घोळ घालण्यास सुरुवात केली असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावावी, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.

कोणत्याही सरकारमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. एखाद्या वेळी मुख्यमंत्री अशा घोषणा करण्यासाठी मंत्री नेमतात. आणि ते मंत्री सरकारच्या लाइनवर भाष्य करतात. पण या सरकारमध्ये एकाच विषयावर पाच-पाच मंत्री घोषणा करतात. विशेष म्हणजे प्रत्येक मंत्री घोषणा करून नंतर ही घोषणा मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगत आहेत. हे सगळे श्रेयासाठी सुरू आहे. हे काही पहिल्यांदाच घडलेले नसून यापूर्वी अनेकदा असे घडले आहे. महत्त्वाच्या निर्णयावर सरकारचे म्हणणे स्पष्ट आणि थेट असावे, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

गुरुवारच्या घोषणेमुळे अनेक छोटे दुकानदार सुखावले होते, पण नंतर त्यांचा भ्रमनिरास झाला, असे फडणवीस म्हणाले. सरकारने काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, दुकानदारांना ही वेळ मान्य नाही. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असे दुकानदारांचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले.

मागासवर्ग आयोग हे उशिरा सुचलेले शहाणपण
ओबीसी आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोग नेमणे हे आघाडी सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. राज्य मागासवर्ग आयोग नेमण्याचे स्वागतच आहे. पण १३ डिसेंबर २०१९ रोजीच कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने राज्य मागासवर्ग आयोग नेमायला हवा होता. आयाेग नेमण्यात सरकारने बरेच महिने घालवल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...