आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात युवा साहित्यिकांची मांदियाळी:5 - 6 नोव्हेंबरला युवा साहित्य संमेलनाचे आयोजन; युवा आयकॉन पुरस्काराचे होणार वितरण

नागपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्‍त राज्‍यस्‍तरीय युवा साहित्‍य संमेलन, विदर्भ साहित्‍य संघाची अकोला शाखा व इतर संस्‍थांच्‍या संयुक्‍त विद्यमाने 5 व 6 नोव्‍हेंबर 2022 दरम्‍यान आयोजित करण्‍यात आले आहे.

स्‍व. बाजीराव पाटील साहित्‍य नगरी, प्रभात किड्स स्‍कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे होणारे हे संमेलन विदर्भ साहित्‍य संघाचे दिवंगत अध्‍यक्ष स्‍व. मनोहर म्‍हैसाळकर यांच्‍या स्‍मृतीस समर्पित राहिल.

शनिवारी उद्घाटन

राज्‍यस्‍तरीय युवा साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष लेखक व दिग्‍दर्शक अरविंद जगताप आहेत. अकोल्‍याचे आमदार बसंत खंडेलवाल यांच्‍या हस्‍ते शनिवार, 5 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 9 वाजता राष्‍ट्रगौरव दिंडी, साहित्‍य दालन, कवी कट्टा, प्रकाशन मंचाचे उद्घाटन होणार असून त्‍यानंतर सकाळी 10.30 वाजता युवा साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त लेखक ऐश्‍वर्य पाटेकर यांच्‍या हस्‍ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी संमेलनाध्‍यक्ष अरविंद जगताप यांच्‍यासह अकोल्‍याचे आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, साहित्यिक व विभागीय आयुक्‍त डॉ. दिलीप पांढरपट्टे, स्‍वागताध्‍यक्ष संग्रामभैय्या गावंडे यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहिल.

विविध विषयांवर परिसंवाद

या दोन दिवसीय संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कविसंमेलन, सांस्‍कृतिक कार्यक्रम, टॉक शोचे आयोजन करण्‍यात आले आहे. रविवार, 6 नोव्‍हेंबरला दुपारी 1 वाजता माजी गृहराज्‍यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेत ‘युवा आयकॉन पुरस्‍कार’ वितरण सोहळा आयोजित करण्‍यात आला आहे. यावेळी आमदार विप्‍लव बाजोरिया, जिल्‍हा पोलिस अधिक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्‍हाधिकारी प्रा. संजय खडसे यांची उपस्‍थ‍िती राहिल.

आयोजकांकडून काळजी

संमेलनाचा समारोप 6 रोजी दुपारी 4 वाजता आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व संमेलनाध्‍यक्ष अरविंद जगताप यांच्‍या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनानंतर हे पहिले साहित्य संमेलन आहे. या संमेलनात कोणतीही कमतरता राहू नये याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...