आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन विशेष:कोरोनामुळे जग थांबलेले असताना सुरू होती पालडोहची जि.प. शाळा

नागपूर (अतुल पेठकर)19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांच्यासह शाळेतल्या चार शिक्षकांनी स्वत: लसीकरण करून गावकऱ्यांना केले प्रेरित

इंग्रजी शाळांच्या स्तोमामुळे मराठी शाळा एकेक करून बंद होत असताना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील उपस्थिती दिवसेंदिवस रोडावत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील पालडाेह येथील शाळेत प्रवेशासाठी चक्क वेटिंग लिस्ट असते! विशेष म्हणजे काेरोनामुळे सारे जग थांबलेले असताना पालडोहची शाळा ऑफलाइन आणि डिजिटल अशा दोन्ही पद्धतीने सुरू होती. शिक्षण क्षेत्रातील दशरथ मांझी अशी ओळख असलेले मुख्याध्यापक राजेंद्र उदेभान परतेकी यांची दूरदृष्टी, अचूक नियोजन आणि परिश्रम या मागे आहे. या कोराेनाकाळात सर्वत्र शाळा बंद आहेत, पण इथे मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात शाळेने आपला सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून एक उदाहरण सादर केले. या वर्षीसुद्धा मुलांनी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. या कोरोनाकाळात सुरुवातीला लोक लस घेण्यासाठी तयार होत नव्हते. पण शाळा सुरू राहिली पाहिजे यासाठी गावकऱ्यांनी परतेकी यांच्या विनंतीवरून लस घेतली. सर्वप्रथम शाळेतील चारही शिक्षकांनी दोन्ही डोस घेऊन पालकांना आश्वस्त केले. हळूहळू सर्व गावकऱ्यांनी आवर्जून लस घेतली. शाळेचा येथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर आहे. १९९१ पासून शाळा सुरू आहे. सध्या शाळेची पटसंख्या १९२ आहे. लगतच्या गावातील १०९ विद्यार्थीही येथे शिकतात. बसायला जागा नसल्यामुळे मुलांना प्रवेश नाकारला, तर असंख्य मुले प्रतीक्षा यादीवर आहेत. शाळेची सुरुवात २०-२२ विद्यार्थ्यांपासून झाली. इयत्ता पहिली ते आठवी असे वर्ग भरतात. पण वर्गखोल्या फक्त चार असून शिक्षक पण चारच आहेत. शाळा ३६५ दिवस चालत असल्यामुळे येथे शिक्षक येण्यास टाळतात. शाळेला संरक्षण भिंत तसेच क्रीडांगण नाही. क्रीडांगण नसल्याने रस्त्यावर मैदानी व वैयक्तिक खेळ होतात, तर शेतात लांब उडीचे मैदान तयार केले आहे.

मुले शिकतात मुलांच्या मदतीने शाळेत मुले मुलांच्या मदतीने शिकतात. शिक्षक शाळेत नसले तरी मुलांचे शिकणे थांबत नाही. सकाळी ७ ते ८ या वेळेत इंग्रजी, मराठी व्याकरण, पूरक मार्गदर्शन करण्यात येते. रविवार व सुटीच्या दिवशी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सामान्यज्ञानावर आधारित परीक्षा घेण्यात येते. शाळेत साहित्याचा वापर करून अध्यापन करतात. एनएएस परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मुलांनी स्वत: काढल्याचे परतेकी म्हणालेे. येथे शाळाबाह्य मूल दाखवा व एक लाख मिळावा असा फलक लावलेला आहे.

पहाटे साडेचारला सुरू होते शाळा, रात्री ८ वाजता संपते
पहाटे साडेचारला सुरू होणारी शाळा विविध उपक्रम राबवून रात्री ८ वाजता संपते. विद्यार्थी पहाटे उठून धावण्याचा सराव करतात. सकाळी ९ वाजता मुले शाळेत येतात.
सकाळी ९.३० ते १० वाजेपर्यंत पूरक मार्गदर्शन केले जाते. हे पूरक मार्गदर्शनसुद्धा मुलेच घेतात व त्यावर चाचणीसुद्धा मुलेच काढतात, असे परतेकी यांनी सांगितले.
पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे परिपाठात विविध उपक्रम घेतले जातात. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत परिपाठ सादर केला जातो. परिपाठात २१ मुद्द्यांचा समावेश केला जातो.
त्यामुळे मुलांची स्टेज डेअरिंगसुद्धा वाढलेली आहे. स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीची तयारी परिपाठातूनच करण्यात येते. विद्यार्थी इंग्रजीतून मुलाखत घेतात. परिपाठात नाट्यरूपांतर केले जाते.

ग्रामस्थांनी दिले दाेन लाख रुपये
८० घरांच्या पालडोहची लोकसंख्या ४८१ इतकी आहे. गावात हनुमानाचे एकच मंदिर आहे. डोंगर उतारावर भरणाऱ्या शाळेला स्वत:ची जमीन घेता यावी म्हणून ८० घरांनी घरटी दोन हजार प्रमाणे १ लाख ६० रुपये निधी संकलन केले. हनुमान मंदिराच्या दानपेटीतील ४० हजार रुपये शाळेला कमी पडलेले चाळीस हजार रुपये दिले. अशा रीतीने सुमारे दोन लाख रुपयांत शाळेसाठी जमीन खरेदी करण्यात आल्याचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांनी “दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...