आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एरवी मंत्री आले की अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू होते... पण रविवार, २० डिसेंबर राेजी सायंकाळी नागपूरच्या पोलिस लाइन टाकळी येथील सद्भावना लाॅनमध्ये झालेल्या विवाह समारंभात निराळे चित्र हाेते. वधूपिता असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे वरपिता झालेले जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे स्वागत करत होते... कारणही तसेच होते. गतिमंद व मूकबधिर अनाथ मुलांच्या संगोपनासोबतच पुनर्वसनासाठी नि:स्पृहपणे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वर्षा शंकरबाबा पापळकर व अनाथालय-बालगृहातील समीर यांचा विवाह रविवारी गोरज मुहूर्तावर थाटात पार पडला. वधू वर्षाचे कन्यादान गृहमंत्री अनिल देशमुख व आरती देशमुख यांनी केले, तर मूकबधिर असलेल्या समीर याच्या वरपित्याची जबाबदारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व ज्योत्स्ना ठाकरे यांनी स्वीकारली.
भव्य विवाह सोहळा पाहून शंकरबाबांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लाॅनच्या गेटपासून व्यासपीठापर्यंत वधू वर्षाला डोलीतून आणले. आपल्या सुनेला आणताना जिल्हाधिकारीही आनंदून गेले होते. सनई-चौघड्यांच्या मंगल सुरांनी या वधू-वरांचे जीवन मंगलमय झाले. मंगलाष्टके झाल्यानंतर वधू-वरांनी एकमेकांना जीवनभर आश्वासक सोबत देण्याची ग्वाही देत सप्तपदी पूर्ण केली. या वेळी सहभागी वऱ्हाड्यांनी वधू-वरांना गृहोपयोगी वस्तूंची भेट आणली होती. दरम्यान, पालकमंत्री नितीन राऊत, सरसंघचालक माेहन भागवत यांनीही विवाह साेहळ्यास हजेरी लावत नवविवाहित दांपत्यास शुभाशीर्वाद दिले. हा संपूर्ण साेहळा शंकरबाबा पापळकर दूर राहून व्रतस्थतेने पाहत होते. या वेळी त्यांच्या डोळ्यांतून आलेल्या अश्रूंचेही तीर्थ झाले.
वर-वधू दोघांचाही केला सांभाळ : वर्षा नागपूर रेल्वेस्थानकावर, तर समीर डोंबिवली येथे बेवारस अवस्थेत सापडला होता. दोघांचाही शंकरबाबांनी सांभाळ केला. समीरने बालगृहातील वर्षासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना स्वतंत्र घर देऊन स्वावलंबी केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बालगृहाला भेट दिली असता दोघांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवून संमती मिळाल्यानंतर कन्यादान करण्याचे त्यांनी मान्य केले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.