आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपरफुटी प्रकरण:मंत्रालयातून अनेक कंत्राटे मिळवून दिल्याने देशमुख बनला जीए सॉफ्टवेअरचा संचालक

वर्धा / मंगेश फल्लेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभर गाजत असलेल्या आरोग्य भरती परीक्षा, म्हाडा परीक्षा पेपरफुटीचा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी ) गैरव्यवहारही उजेडात आला. या गैरव्यवहारात कोट्यवधी रुपयांची रक्कम आढळल्याने खळबळ उडाली. या गैरव्यवहारात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या आजी-माजी अध्यक्षांचा सक्रिय सहभाग दिसून आल्याने त्यांना गजाआड होण्याची वेळ आली. या गुन्ह्यात जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आजी-माजी संचालकांनाही अटक करण्यात आली आहे. डॉ. प्रीतीश देशमुखही त्यातीलच आरोपी.

मुंबईतील मंत्रालयातून वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट जीए सॉफ्टवेअर कंपनीला त्याने मिळवून दिल्यानेच त्याला थेट कंपनीच्या संचालकपदी बसवण्यात आले. डॉ. प्रीतीश देशमुख सध्या पुण्यातील पिंपळे गुरव परिसरात राहत असून तो मूळचा वर्ध्याचा रहिवासी आहे. एमबीबीएस केल्यानंतर त्याने हॉस्पिटलमध्ये काम न करता राजकीय ओळखीतून मंत्रालयात लायझनिंगची (मध्यस्थ किंवा दलाल)कामे सुरू केली. यादरम्यान राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी त्याचे चांगल्या प्रकारे धागेदोरे जुळले आणि लायझनिंगच्या कामातून त्याचे चांगल्या प्रकारे आर्थिक स्रोत निर्माण झाले. बंगळुरूची कंपनी जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत तो रुजू झाला. अल्पावधीत कंपनीला विविध कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले. परिणामी त्याची कंपनीच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली. राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव ढेरे यांनी २०१७ च्या परीक्षेत गैरव्यवहार केल्याची बाब पुणे पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. चौकशीदरम्यान प्रीतीश देशमुख आणि त्याचे दोन एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांचाही सहभाग असल्याचे राज्य परीक्षा आयोगाचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या चौकशीत समोर आले आहे.

१० ते १२ जिल्ह्यांतील पोलिस भरती परीक्षाही संशयाच्या भोवऱ्यात
टीईटी पेपरफुटी उघड झाल्यानंतर देशमुख याच्या अंगझडतीत तसेच घर-ऑफिसच्या झडतीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक डेटा हस्तगत केला आहे. त्याचे विश्लेषण केले असता पोलिसांना २०१९ च्या टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराचेही धागेदोरे मिळाले आहेत. त्यासोबतच पोलिस भरती परीक्षेतील परीक्षार्थींची ओळखपत्रेही मिळून आल्याने, जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीने राज्यभरातील १० ते १२ जिल्ह्यांत घेतलेली पोलिस भरती परीक्षाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

प्रीतीशबाबत बोलण्यास कुटुंबीयांचा नकार, म्हणाले, तो येथे राहत नाही
डॉ.प्रीतीश देशमुख वर्धा येथील उच्चभ्रू सोसायटी स्नेहलनगर परिसरात राहतो. पाच ते सहा गुंठ्यांच्या जागेत ‘राजवाडा’ नावाचे त्याचे दुमजली घर असून त्याभोवती गार्डन आणि कार पार्किंगसाठी जागा आहे. डॉ. प्रीतीश याच्यावर पुणे पोलिसांनी केलेल्या आरोपांबाबत त्याच्या आईची प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, प्रीतीश याठिकाणी राहत नाही. पोलिस त्याच्याबाबत जे आरोप करत आहेत त्याबाबत आम्हाला काही बोलायचे नाही. पोलिसांना काय आरोप करायचे आहेत ते करू दे, आमच्याकडे अद्याप काेणीही चौकशीस आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...