आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन हत्ती नेले जामनगरला:गडचिरोली जिल्ह्यातील पातानील हत्तीकॅम्पमधून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या खासगी प्राणिसंग्रहालयात

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागा अंतर्गत येत असलेल्या पातानील हत्ती कॅम्पमधील तीन हत्तींना गुरूवारी मध्यरात्री गडचिरोलीहून गुजरातमधील जामननगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या खासगी प्राणिसंग्रहालयासाठी रवाना करण्यात आले. शुक्रवारी नागपूरमार्गे हे हत्ती रवाना झाले. या शिवाय लवकरच कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्पमधील सातपैकी तीन हत्तींनाही नेण्यात येणार आहे. कमलापूर हा महाराष्ट्रातील एकमेव हत्तीकॅम्प आहे.

नक्षलवाद्यांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या कमलापूर या गावाला हत्तीकॅम्प मुळेच नवी ओळख प्राप्त झाली आहे. 1980 च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिली सभा कमलापूर येथेच घेतली. त्यामुळे नक्षलवाद्यांचे माहेरघर हीच ओळख कमलापुरला चिकटली. मात्र, वनविभागाच्या शासकीय हत्ती कॅम्पमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आणि कमलापूरला महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेले गाव म्हणून ओळख मिळाली. आता अंबानींच्या प्राणिसंग्रहालयाची शान वाढविण्यासाठी कमलापूर येथील हत्तींना गुजरात येथे हलविण्यात येणार आहे.

नक्षलवाद्यांचा माहेरघरची ओळख पुसून काढलेल्या वन विभागाच्या या शासकीय हत्तीकॅम्पचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. त्यामुळे गावकऱ्यांकडूनच नव्हे तर समस्त पर्यटक आणि वन्यप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार गुजरातच्या जामनगर भागात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय उभारले जात आहे.

या खाजगी प्राणीसंग्रालयासाठी पूर्व विदर्भातील सर्वच ठिकाणच्या हत्तींना गुजरात येथे हलविणार असल्याची माहिती आहे. जामनगर येथील हे संग्रहालय रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ पुत्र अनत अंबानी यांचा "ड्रीम प्रोजेक्ट" आहे. द ग्रीन झुओलॉजीकल रेस्क्यू अँड रिहाबिलिटेशन किंगडम असे या प्रकल्पाचे नाव आहे.

गेल्या दोन वर्षात कमलापूर येथील हत्ती कॅम्प मध्ये असलेल्या 10 हत्तींपैकी आदित्य, सई आणि अर्जुन या तीन हत्तींच्या पिलांचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी कमलापूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेताना येथील हत्तींना कुठेही हलविणार नसल्याची ग्वाही दिली होती. त्यावेळी याठिकाणी केवळ 7 हत्ती उरले होते. 8 जानेवारी 2022 रोजी प्रियंका नावाच्या हत्तीणीने एका पिलाला जन्म दिला. असून आता या ठिकाणी हत्तींची संख्या आठवर पोहोचली आहे.

बातम्या आणखी आहेत...