आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महार्गाच्या उद्घाटनासाठी 'तारीख पे तारीख':दहा तासात नागपूर ते मुंबई कधी जाता येईल; जनतेला प्रतीक्षा

नागपूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भाला समृद्धीचा मार्ग दाखवणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन नेमके कधी होणार असा प्रश्न आता राज्यातील जनतेकडून विचारला जात आहे. कारण तारखावर तारखा पडूनही महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त काही केल्या लागत नाही. या महामार्गाच्या मागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपायला तयार नाही. परिणामी दहा तासात नागपूर ते मुंबईत कधी जाता येईल याची जनतेला प्रतीक्षा आहे.

गेल्या दोन वर्षात समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या किमान 10 वेळा तारखा जाहीर झाल्या. मात्र, एकदाही उदघाटनाचा मुहूर्त साधण्यात विद्यमान आणि यापूर्वीच्या सरकारला यश आलेले नाही. विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असा दावा प्रारंभापासून करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग झाल्यानंतर विदर्भ एकदम सुजलाम सुफलाम होईल असे चित्र रंगवले जात आहे. असा हा समृद्धी महामार्ग अजूनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन वर्षात "समृद्धी एक्सप्रेस- वे' च्या उद्घाटनाचा अनेक वेळा मुहूर्त ठरला. कधी कुठे बांधकामाचा काही भाग कोसळणे, तर कुठे अपूर्ण काम अशा अनेक कारणांनी उद्घाटन टळत गेले. आता-तर लोकांना देखील समृद्धी महामार्ग उद्घाटनाची उत्सुकता राहिलेली नाही.

गेल्याचं महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धीचे उद्घाटन नोव्हेंबर महिन्यात होईल, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागण्यात आली आहे, असे जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील समृद्धीच्या उद्घाटनाला नोव्हेंबरचा मुहूर्त निघाला असल्याचे सांगितले होते. मात्र,आता पून्हा नवीन डेडलाईन समोर आली आहे. समृद्धीचे उद्घाटन नोव्हेंबर ऐवजी आता जानेवारी महिन्यात करण्याचा बेत असल्याची नवीन तारीख जाहीर झाल्याने तारीख पे तारीख वाला खेळ कधी संपणार हा प्रश्न जनतेला पडलेला आहे.

नवनवीन तारखा मिळत आहे

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्याची पहिली तारीख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. सुरुवातीला नागपूर ते शेलू बाजार, वाशिम असा 210 किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन 1 मे 2020 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते मात्र, तो मुहूर्त हुकला. त्यामुळे नवा मुहूर्त म्हणून 15 ऑगस्ट ही डेडलाईन ठरवण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021, 31 मार्च 2022 तारीख देण्यात आली होती. मावळत्या सरकारने यावर्षी मे आणि नंतर जून महिन्यात मुहूर्त ठरवला होता. मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर घडल्यामुळे उद्घाटन पुन्हा मागे पडले. आता नवीन सरकारने यावर्षी नोव्हेंबरमध्ये उद्घाटनाचा बार उडवू अशी घोषणा केली. मात्र, तीही हवेत वीरल्यामुळे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला पुढील वर्ष उजडणार हे निश्चित झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...