आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे नियोजन आणि समन्वय पूर्णपणे चुकले. माझ्यासारख्या आमदाराला शिवसेनेचे उमेदवार फक्त ट्रायडंटमध्ये भेटले. त्यांनी एक फोनही केला नाही. तरीही मी त्यांना मतदान केले. आम्ही प्रामाणिकपणे मतदान करुनही आमची बदनामी केली जाणे योग्य नाही. तसेच येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची याविषयी चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट घेणार असल्याचे स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भूयार यांनी नागपुरात सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी आले असता ते विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
मी शिवसेनेचा आमदार असतो आणि मत दिले नसते तर ती गद्दारी ठरली असती. मी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडून आलो आहे. लोकसभेपासून मी महाविकास आघाडीसोबत आहे. शिवसेनेकडून मंत्रींपदाची ऑफर असतानाही त्यांच्याकडे गेलो नाही. मी कायम राष्ट्रवादीसोबत राहिलो. पवार साहेब, अजितदादा व जयंत पाटील यांच्याशी सुरुवातीपासूनच जुळलेला होतो. मग गद्दारीच करायची तर यापूर्वीही केली असती. पण, मत देऊनही असे आरोप होत असेल तर संजय राऊत यांचे कुठेतरी चुकत आहे. पण, आमच्याबाबत अविश्वास दाखवणे चुकीचे आहे, असे भूयार म्हणाले.
तर विचार करावा लागेल...
राज्यसभा निवडणूकीत दाखवण्यात आलेला अविश्वास हा केवळ एकट्या दुकट्यावर नव्हे तर संपूर्ण अपक्षांवर दाखवण्यात आला आहे. याचा आम्हा सर्व अपक्षांनी एकत्रित येऊन विचार करावा लागेल. पण, मतदान मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच करू, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री वेळच देत नाही
मुळात मुख्यमंत्र्यांशी भेटच होत नाही. ते आम्हाला वेळ देत नाही, त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले. पंधरा सोळा पत्रे लिहिली. एकाचेही उत्तर आले नाही. त्यांना व्यक्तिगत नव्हे तर मतदारसंघाची कामे सांगितली होती, असे भूयार यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.