आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरूवारी रात्री चोरीला गेलेल्या मुलाचा अवघ्या पाच तासात शोध घेऊन पोलिसांनी बाळला आईकडे सुखरूप परत केले. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास लावण्यासाठी 105 सीसीटीव्हीचे फुटेज तपासले तर 10 जणांची विचारपूस केली.
या प्रकरणी फरजाना उर्फ अंसार कुरैशी, सीमा परविन अब्दुल रऊफ अन्सारी, बादल धनराज मडके, सचिन रमेश पाटील या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर योगेंद्र प्रजापती, रिटा प्रजापती व श्वेता खान हे तिघे फरार आहेत. इंदोरा चौकात असलेल्या एका दाम्पत्याला स्वत:चे मूल नसल्याने शेजाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.
काय म्हणाले आयुक्त?
नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारपरिषदेत माहिती देताना आठ महिन्याच्या बाळाचे शेजाऱ्यानेच अपहरण केल्याची माहिती दिली. जितेंद्र राजू निशाद असे अपहृत बाळाचे नाव आहे. फिर्यादी राजकुमारी राजू निशाद (वय 35) या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिखली झोपडपट्टीत राकेश कबाडीवाल्याच्या दुकानाच्या मागे राहातात. त्यांच्या शेजारी आरोपी योगेंद्र प्रजापती (वय 35) हा तीन आठवड्यापासून भाड्याने राहातो. शेजारी असल्याने त्यांच्यात ओळखी झाली. कालांतराने आरोपी योगेंद्र प्रजापती कुटुंबासह राजकुमारी निशाद यांच्या घरी जाऊन आठ महिन्यांच्या जितेंद्रला खेळवित असे.
105 सीसीटीव्ही तपासले
घटनेच्या दिवशी गुरूवार, 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास आरोपी योगेंद्र प्रजापती हा निशाद यांच्या घरी गेला. मुलाला बाजूच्या दुकानात खाऊ घेऊन देतो असे सांगून घेऊन गेला. राजकुमारी निषाद यांनी मुलाला नेण्यास विरोध केला असतानाही आरोपी योगेंद्र प्रजापती मुलाला जबरदस्तीने घेऊन गेला. व नंतर मुलाला परत आणून दिले नाही. त्याच्या आई वडीलांनी दिवसभर मित्र, नातेवाईकांकडे शोधाशोध केली. त्या नंतरही मुलगा आढळून आला नाही. शेवटी गुरूवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास आई वडीलांनी कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात शेजाऱ्यानेच मुलाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला.
5 तासात अपहरणकर्त्यांचा घेतला शोध
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कळमना पोलिसांसोबतच यशोधरा पोलिसांनीही शोध सुरू केला. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासात मोलाच्या सूचना केल्या. पोलिसांनी वेगाने तपास करीत अवघ्या पाच तासात अपहरणकर्त्यांचा शोध घेत मुलाची सुखरूप सुटका केली. व मुलाला आईच्या स्वाधीन केले. नागपूर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.