आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात घातपाताचा डाव?:रेल्वेस्थानकात आढळली बॉम्बसदृश वस्तू, पोलिस करणार सीसीटीव्ही फुटेजचा तपास

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर रेल्वे स्थानकावर काल रात्री बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिस व बॉम्ब शोधक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या वस्तूची तपासणी केली. तेव्हा ते कमी तीव्रतेचे डिटोनेटर्स असल्याचे स्पष्ट झाले. हे डिटोनेटर्स काही वायरींसोबत जोडली असल्याने धोकादायक होती. मात्र, बॉम्बशोधक पथकाने हे डिटोनेटर्स आता डिफ्यूज केले आहेत. त्यामुळे दुर्घटना टळली आहे.

स्थानक परिसरात बॉम्ब सदृश वस्तू सापडताच पोलिस व बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती.
स्थानक परिसरात बॉम्ब सदृश वस्तू सापडताच पोलिस व बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती.

सोमवारी रात्री साधारण 9.30 वाजेच्या सुमारास हे डिटोनेटर फ्युज केलेल्या वायर्ससह सापडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सावधानता बाळगत तातडीने परिसराची नाकेबंदी केली होती. आतादेखील या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही स्फोटके नेमकी कोणी व का ठेवली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे परिसरात संशयास्पद रित्या डिटोनेटर सापडले आहेत. सर्वप्रथम परिसरातील एका ट्राफिक पोलिसाला ही संशयास्पद बॅग दिसली होती. त्याने तातडीने शहर पोलिस व रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर शहर आयुक्त अमितेश कुमार यांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. या पथकानेच बॅगेत स्फोटक सामुग्री असल्याची स्पष्ट केले, असे पांडे यांनी सांगितले.

पोलिसांनी जप्त केलेले डिटोनेटर्स. साधारणत: विहिर खोदण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.
पोलिसांनी जप्त केलेले डिटोनेटर्स. साधारणत: विहिर खोदण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न
संशयित स्फोटक साहित्य सध्या नागपूर पोलीस मुख्यालयात कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. नागपूर सीपी अमितेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कमी तीव्रतेची स्फोटके निकामी करण्यात आली. 'आम्ही विविध पैलूंचा विचार करत आहोत आणि सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत,' असे नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...