आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेला स्थगिती, राज्य सरकारला 27 ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच राज्य सरकारला नोटीस बजावत २७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.

वाहतूक पोलिस शिपायाला मारहाण केल्या प्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयाने ठाकूर यांना ३ महिने कारावास आणि १५ हजार ५०० रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. अमरावती जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर यशोमती ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यावर गुरूवारी स्थगिती देण्यात आली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत राज्य सरकारला शपथपत्र सादर करण्याचा आदेश दिला. याप्रकरणी ॲड. यशोमती ठाकूर यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. कुलदीप महल्ले यांनी सहकार्य केले. राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील जोशी यांनी नोटीस स्वीकारली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या ठाकूर यांना १५ ऑक्टोबरला आठ वर्ष जुन्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली होती. २४ मार्च २०१२ रोजी ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीमधील अंबादेवी मंदिराजवळ वाहतूक पोलिस शिपाई उल्हास रौराळे यांच्यासोबत बाचाबाची केली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी रौराळे यांना रस्त्यावरच थापड मारली होती. त्यानंतर रौराळे यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता.