आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यु-ट्यूबवर व्हिडीओ पाहून केला चोरीचा सराव:एटीएममधून पैसे काढणाऱ्या गँगला सापळा रचून पोलिसांनी केली अटक

नागपूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर शहराच्या विविध भागातील जवळपास 33 एटीएममधून चोरून पैसे काढणाऱ्या एका गँगला पकडण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. नागपूरच्या तहसील पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने एटीएममधून चोरी करण्याची माहिती मिळाली होती.

ऑगस्टपासून पोलिस या चोरट्यांच्या मागावर होते अशी माहिती तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी दिली. शेवटी सापळा रचून हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

चोरीचा सराव करत

या गँग मधल्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या जलेश्वर आणि प्रतापगड येथील रहिवासी राहुल राकेश सरोज (वय 24), संजयकुमार शंकरलाल पाल (वय 23) आणि अशोक श्रीनाथ पाल (वय २६) अशी आरोपींची नावे आहेत. तर विनोद बडेलाल सरोज (वय 25), मोनू लल्लु सरोज (वय 22) या आरोपींसोबत तिघांनी नागपुरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. या चोरट्यांनी यु ट्यूबवर चोरीचे व्हिडीओ पाहून चोरीचा सराव केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अशी करत होते चोरी

तीनही आरोपी गेल्या पाच महिन्यापासून नागपुरात राहत होते. वेगवेगळ्या एटीएममध्ये जाऊन तिथे ते रेकी करत होते. सेक्युरिटी गार्ड असलेले एटीएम हेरून तिथे चोरी करीत होते. हे तिन्ही आरोपी एटीएममध्ये स्क्रू ड्रायव्हरच्या माध्यमातून त्यातील ट्रे काढत होते. आणि नोटा जिथूत बाहेर येतात तो नोब बंद करून ठेवत असे. यामुळे कोणी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये यायचे तेव्हा पैसे बाहेर न पडता ट्रेमध्ये अडकून राहायचे.

पोलिस स्टेशनच्या परिसरात घटना

आरोपी नंतर येऊन स्क्रू ड्रायव्हरने हा ट्रे उघडून पैसे लुटून न्यायचे. एखादा ग्राहक एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्यासाठी ऑप्शन टाकता असे आणि नंतर नोटांची जेव्हा मोजदाद होत तेव्हा पैसे बाहेर येत नव्हते. ग्राहक एटीएममधून गेल्यावर नंतर आरोपी पॅनल उघडून पैसे बाहेर काढून घेत होते. या तिन्ही आरोपींनी तहसील पोलिस स्टेशनच्या परिसरात अशा घटना केल्याचे सांगितले आहे.

असा आला गुन्हा उघडकीस

संपूर्ण नागपूर शहरात जवळपास 33 ठिकाणी अशा पद्धतीने एटीएम मधून पैसे काढले आहे. या घटना हे आरोपी शनिवारी किंवा रविवारी करत होते. पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारावर अशा पद्धतीने एटीएममधून लूट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून साध्या वेशातल्या पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

एटीएमची सुरक्षा

आता या प्रकरणानंतर सर्व बँकांना नागपूर पोलिसांच्या वतीने आणखी सुरक्षेचे आवाहन करण्यात आले आहे. एटीएमच्या जवळ सुरक्षारक्षक तैनात ठेवावा आणि सीसीटीव्ही सुद्धा 24 तास उपलब्ध असावे असेही आदेश देण्यात आले आहे.