आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर-शिर्डी टप्प्याचे 11 डिसेंबरला लोकार्पण:पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार समृद्धी महामार्गाच्या साडेदहा किमीची पाहणी

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या दिवशी पंतप्रधान शिवमडका या समृद्धी महामार्गाच्या आरंभबिंदूपासून ते वायफड या पूर्वीच्या सभास्थानापर्यंत सुमारे साडेदहा किमीची पाहणी करणार असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. या प्रवासासाठी त्यांना ८ मिनिटे लागतील, असेही त्यांनी सांगितले. शिवमडका या समृद्धी महामार्गाच्या आरंभबिंदूपाशी १८ एकर परिसरात एक मोठा चौक तयार केला आहे. या चौकाला ९३० मीटर म्हणजे साधारणत: १ किमी प्रदक्षिणा करावी लागेल. नागपूर, अमरावती आणि अमरावतीकडून येणारे मार्ग या चौकात एकत्र येतात. इथूनच पुढे मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू होतो. दारात जशी रांगोळी असते तसा रांगोळी पॅटर्नवर चौक डेव्हलप केला आहे. स्थानिक झाडाच्या प्रजाती लावलेल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. रविवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या दौऱ्याचा आढावा घेत शिर्डीपर्यंतच्या मार्गाची पाहणी केली. त्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमस्थळांची पाहणी केली. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासह मेट्रो, एम्सचे लोकार्पण, वंदे मातरम रेल्वे आदी इतर अनेक प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे.

लोकांच्या सोयीसाठी एम्सच्या मागील मैदानावर कार्यक्रम पूर्वीच्या उद्घाटन कार्यक्रम स्थळात बदल करण्यात आला. पूर्वी हा कार्यक्रम महामार्गावरील वायफड टोलनाक्याजवळ नियोजित होता. दहा ते पंधरा हजार नागरिक बसू शकतील अशी व्यवस्था केली जाणार होती. आता मिहानमधील एम्स रुग्णालयाच्या मागच्या भागात मुख्य कार्यक्रम होणार आहे. वायफड लोकांना दूर पडले असते. खापरी रेल्वेस्थानकापासून वायफड आठ ते दहा किमी आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोईसाठी एम्सच्या मागील मैदान निवडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...