आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्य सरकारने जय्यत तयारी केली आहे.
दरम्यान, याच दिवशी नागपूर येथील विस्तारित मेट्रो प्रकल्पाचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गावरून वन-वे 15 किमी जाणे येणे करणार असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली. नागपूर जिल्ह्यातील वायफड टोलनाक्याजवळ लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तिथे 15 हजार लोक बसू शकतील असा मंडप उभारण्यात येत आहे.
नागपूर ग्रामीणमध्ये असलेल्या जामठा क्रीकेट स्टेडियमपासून 500 मीटर अलिकडे असलेल्या जामठा इंटरचेंजपासून पश्चिमेला सहा किमीवर समृद्धी महामार्ग लागतो. या जामठा इंटरचेंजपासून पंतप्रधान रस्ते मार्गे प्रवास करणार आहे. 15 किमी जाणे आणि तितकेच येणे असा 30 किमीचा प्रवास राहणार असल्याचे मोपलवार यांनी सांगितले. पंतप्रधान हवाई पाहणी करण्याची शक्यता मोपलवार यांनी फेटाळून लावली.
सुमारे 10 जिल्हे आणि 26 तालुक्यांतून गेलेल्या तसेच 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी या 520 किमी अंतराचे काम पूर्ण झाले आहे. येत्या 11 डिसेंबरपासून हा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर वन्यजीव संरक्षणासाठी एकूण 80 बांधकामे प्रस्तावित केली आहेत. त्याची संरचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. वन्यजीवांचा वावर असलेल्या ठिकाणी ध्वनिरोधक ठिकाण तयार केले आहे; तर आवश्यक ठिकाणी संरक्षणभिंतीची उभारणी केल्याचे एमएसआरडीसीने सांगितले.
प्रारंभी नागपूर ते सेलू या 210 किमीच्या मार्गाचे लोकार्पण होणार होते. त्याची तयारीही पूर्ण झाली होती. दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्या नंतर काम अपूर्ण असल्याचे कारण देत हे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले होते.
समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्याची पहिली तारीख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. सुरुवातीला नागपूर ते सेलू बाजार, वाशिम असा 210 किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन 1 मे 2020 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते मात्र, तो मुहूर्त हुकला. त्यामुळे नवा मुहूर्त म्हणून 15 ऑगस्ट ही डेडलाईन ठरवण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021, 31 मार्च 2022 तारीख देण्यात आली होती. मावळत्या सरकारने यावर्षी मे आणि नंतर जून महिन्यात मुहूर्त ठरवला होता. मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर घडल्यामुळे उद्घाटन पुन्हा मागे पडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.