आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणत्या गोष्टीतून कशाचा शोध लागेल हे कुणालाच माहिती नसते. एका गरीब मुलाची चोरीला गेलेली मोटारसायकल आपल्याच पोलिस ठाण्यात बेवारस स्थितीत पडून असल्याचे आपल्यालाच माहिती नसल्याची गोष्ट नागपुरातील कळमना पोलिस ठाण्यातील पीएसआय नितीन कोयलवार यांच्या जिव्हारी लागली. त्यातून त्यांनी “पोलिस क्लब इंडिया’ अॅप तयार केले. त्यामुळे आता चोरीला गेलेले, हरवलेल्या व्यक्ती याची संपूर्ण माहिती एकाच वेळी संपूर्ण देशभरातील पोलिस ठाण्यांना होणार आहे. गुगल “प्ले-स्टोअर’मधून हे अॅप नि:शुल्क डाऊनलोड करता येणार आहे.
भारतातील २८ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेेश, देशभरातील सर्व पोलिस ठाणी या अॅपमध्ये जोडली गेली आहेत. राज्यासह कोणत्याही राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्याशी सामान्य माणूस थेट संपर्क करू शकतो. कारण संबंधित पोलिस ठाण्याचा लँडलाइन नंबर समाविष्ट केलेला आहे. मोटारसायकल चोरी गेल्याची तक्रार घेऊन एक मुलगा आला. या मुलाचे आईवडील मोलमजुरी करतात. हा मुलगा रात्री एका एटीएमवर गार्डची नोकरी करून दिवसा महाविद्यालयात जातो. त्याने कसेबसे पैसे जमवून ही सेकंडहँड मोटारसायकल घेतली होती. त्यामुळे अत्यंत काकुळतीला येऊन त्याने कोयलवार यांना कसेही करून शोध घेण्यास सांगितले.
अनेकदा चोरीला गेलेले वाहन कुठे सापडले तर संबंधित पोलिस ठाण्यात त्याची बेवारस म्हणून नोंद करून ते तिथे ठेवले जाते. तसेच आरटीओला पत्र लिहून मूळ मालकाचे नाव व पत्ता मागितला जातो. परंतु अशी अनेक बेवारस वाहने अनेक पोलिस ठाण्यांत वर्षानुवर्षे पडून आहेत. या प्रकरणात या मुलाचे चोरीला गेलेले वाहन आपल्याच पोलिस ठाण्यात बेवारस पडून असल्याची माहिती कोयलवार यांना नव्हती. कोयलवार यांच्या संवेदनशील मनाला ही गोष्ट चांगलीच लागली. त्यातूनच या अॅपची कल्पना सुचल्याचे कोयलवार यांनी सांगितले.
इतर पोलिस ठाण्यांना माहीत नसते, आता सर्वांना मिळेल
अनेक पोलिस ठाण्यांत हरवलेली व्यक्ती वा मोटारसायकल तसेच वस्तूंची नोंद घेतली जाते. मात्र, ही माहिती त्या पोलिस ठाण्याशिवाय इतर कोणत्याही पोलिस ठाण्याला नसते. त्यामुळे तपासात मोठे अडथळे येतात. परिणामी तपासाला अपेक्षित वेळ देता येत नाही, ही खंत होती.
- नितीन कोयलवार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.