आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक सोमवार:वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी दृष्टी आजारामुळे कायमची गेली तरी जिद्दीने शिक्षण घेत झाले सेबीमध्ये असिस्टंट लॉ ऑफिसर

नागपूर / अतुल पेठकर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मूळ चंद्रपूरच्या राहुल केळापुरेचा संघर्ष ठरला अनेकांसाठी प्रेरणादायी

लहानपणी तीन-चार वर्षांचा हाेईपर्यंत “रेटिनायटिस पिग्मेंटोसा’मुळे दृष्टी गेली. डोळ्यासमोरच नव्हे, तर भविष्यासमोरही अंधार दिसू लागला. पहिली ते चौथी चंद्रपूर येथे सर्वसाधारण शाळेत, चौथी ते सातवी आनंदवन येथे अंधांच्या शाळेत आणि सातवी ते बारावीपर्यंत परत चंद्रपूर येथे डोळस मुलांसोबत शिक्षण झाले. पदवीचे शिक्षण मुंबईला झाले आणि एकेकाळी आत्मविश्वास गमावलेला मुलगा आता भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) कायदेशीर व्यवहार विभागात सहायक कायदेशीर सल्लागार आहे. हा आहे राहुल केळापुरेंचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास.

राहुल सांगतात, “शाळेत “डोळस’ मुले माझ्यासोबत खेळत नव्हती. त्यामुळे निराश होताे. शाळेत एकदा एका प्रश्नाचे उत्तर माहिती असूनही देता आले नाही. संतापलेल्या शिक्षकांनी फटकारले, “तुला दहावीची परीक्षा १० वेळा द्यायची आहे का?’ त्यावर मी “नाही, मला प्रथम श्रेणी मिळवायची इच्छा आहे,” असे कसेबसे पुटपुटत सांगितले. घरी आल्यावर आईला शाळेतील प्रकार सांगितला. आईने शांतपणे सल्ला दिला, “तू शिक्षकांना सांगितले ते खरे करून दाखव.’ तो टर्निंग पॉइंट होता. दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीपेक्षा जास्त गुणांसह उत्तीर्ण झालो. सोबत आयुष्यातील अशा अनेक अडथळ्यांना पार केले.’

असा आहे यशाचा प्रवास
१२वीत गुणवत्ता यादीत, मुंबई विद्यापीठातून एलएलबीमध्ये सुवर्णपदक, फायनान्समध्ये एमबीए करून राहुल यांनी जिद्दीने हे यश मिळवले. लोकांसाठी, राहुल ‘दृष्टिहीन’ आहेत, पण त्याला ओळखणाऱ्यांसाठी तो “दूरदर्शी’ आहे. दरम्यान, सेबीची कठीण परीक्षा सर्वोच्च गुणवत्तेसह उत्तीर्ण करत त्यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले.

उत्तम गायक आणि कलावंत
राहुल प्रसिद्ध गायक कुमार सानूच्या हुबेहुब आवाजात गातात. डान्स दिवाने या शोमध्ये कुमार सानूने त्याला खास आमंत्रित केले होते. तिथे ते कुमार सानूसोबत गायले. िदव्यांगांना अर्थसाक्षर करण्यासाठी संपूर्ण भारतात राहुल यांनी शंभरच्या वर कार्यशाळा घेतल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...