आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम जन्मभूमी भूमिपूजन विशेष:आंदोलनाने दिला ओजस्वी वक्ता; अडोणीचा झाला ‘अँथनी!’

अतुल पेठकर | नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरसंघचालकांनी तेव्हा दिला हाेता सरकारला अल्टिमेटम

आज अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा होत आहे. या िनमित्ताने पहिल्या कारसेवेपासून आजपर्यंत अयोध्येसंबंधी अनेक आठवणींना उजाळा मिळत आहे. अशीच एक आठवण तेव्हा अवघ्या १६ वर्षांच्या असलेल्या आणि या निमित्ताने एक उत्कृष्ट वक्ता म्हणून पुढे आलेल्या एका कारसेवकाने सांगितली. १९९० च्या पहिल्या कारसेवेने महाराष्ट्राला एक ओजस्वी वक्ता दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील एक गट कारसेवेसाठी गेला होता. त्यात सोळा वर्षांचा आशुतोष अडोणीही हाेता. कारसेवेपूर्वी ठिकठिकाणी झालेल्या शिलापूजन कार्यक्रमात आशुताेष वक्ता म्हणून पुढे येत होता.

त्या वेळच्या कारसेवेची आठवण सांगताना आशुतोष यांनी सांगितले, “एमपी व यूपीच्या बाॅर्डरवर तेव्हा रेल्वे थांबवण्यात आल्या होत्या. तिथून एका ट्रकने आम्ही कारसेवक चित्रकूटला गेलो. मंदाकिनी नदीमुळे मध्य प्रदेेश विभागले गेले आहे. अलीकडे एमपी व पलीकडे यूपी आहे. तेव्हा सत्याग्रह करून यूपीत प्रवेश करायचा, असे ठरले. तत्पूर्वी मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर झालेल्या सभेत प्रत्येक प्रांतातून एकाला बोलण्याची संधी द्यायचे ठरले होते. वरोऱ्यातील मुलांनी त्या सभेच्या संचालकाला गाठून “विदर्भ प्रांतसे बडा वक्ता आया है’, असे सांगितले. त्याने “नाम क्या है?’ असे विचारताच त्या मुलांनी आशुतोष अडोणी असे सांगितले. गदारोळात संयोजकांनी वेगळेच ऐकले!... आणि त्या ठिकाणी मंचावर उभ्या वक्त्याने “विदर्भ से एक इसाई लडका आशुतोष अँथनी कारसेवा करने आया है. वह भाषण करेगा’, असे सांगितले. पाच मिनिटे वेळ दिला. भाषण तडाखेबंद झाले आणि २० मिनिटे चालले. हे माझ्यासाठी अधिकच महत्वाचे हाेते.’

अडोणी यांनी सांगितले, ‘राजमाता विजयाराजे शिंदे यांनी मला स्वत:जवळ व्यासपीठावर बसवून घेतले. तिथून वक्ता म्हणून माझी ख्याती सर्वदूर झाली.’ आशुतोष आज ४५ वर्षांचे आहेत. दुसरी कारसेवा ६ डिसेंबर १९९२ रोजी झाली होती. त्या वेळी बाबरी पडण्याच्या घटनेचे आशुतोष साक्षीदार आहेत.

... तेव्हाची सरसंघचालकांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना

२०१८ मध्ये ‘आता हिदूंचा संयम संपलाय, तेव्हा सरकारने राम मंदिरासाठी कायदा करावा’, असा इशारा संघभूमीतील हुंकार सभेतून सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्र सरकारला दिला होता. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेला सरसंघचालक, ज्याेतिष पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज, देवनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, साध्वी ऋतुंभरा, विहिंपचे केंद्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार आदींची प्रमुख उपस्थिती होती. तेव्हा मोहन भागवत यांनी व्यक्त केलेली ही इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एकप्रकारे आदेशच असल्याने त्यांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन साध्वी ऋतंभरा यांनी केले होते. आता राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे.

काय म्हणाले होते सरसंघचालक

आता हिंदूंचा संयम संपला असून अयोध्येत राममंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यत संपूर्ण हिंदू समाज कदापि स्वस्थ बसणार नाही. हिंदू समाज सहिष्णु व कायद्याचा सन्मान करणारा असल्यानेच ३० वर्षे होऊनही मंदिर होऊ शकले नाही. न्याय लांबत चालल्याने धीर सुटत चाललाय. जन्मभूमी एकच असते. देशाचे मालक नव्हता तोपर्यंत आम्ही हा विषय बोलत नव्हतो. आता मालक झाल्यावर आम्ही हा विषय बोलतोय. जमिनीखाली मंदिर आहे हे सिद्ध झाले. त्यामुळे सरकारने मंदिरासाठी कायदा करावा.

..आणि टीव्ही संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यात फिरला

अंबरीश पुराणिक सध्या भुसावळ येथील महाजेनकोच्या प्लँटमध्ये उपअभियंता आहेत. ते मूळचे अकोला जिल्ह्यातील जळगाव जामोदचे. ते ९ वर्षांचे असतानाचा हा किस्सा त्यांच्याच शब्दात... “वडील दीनानाथ पुंडलिक जळगाव जामोद तालुका कार्यवाह होते. आमच्या घरी १९९० च्या दरम्यान नुकताच टीव्ही आला होता. क्राऊनचा १२ बटणांचा टीव्ही सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता. “इतरांच्यां घरी व्हीसीआर आणून पिक्चर पाहतात, आपणही आणू’ असा हट्ट आम्ही बाबांकडे करायचो. पण “व्हीसीआर लावला की टीव्ही खराब होतो’ हे आमच्या मनावर बाबांनी ठसवलं होत. याला छेद दिला तो अयोध्येच्या व्हिडिओ कॅसेटनी. आमच्या घरात व्हीसीआर लावून तर ती अनेक वेळा पाहिली गेलीच. पण जळगाव जामोद तालुक्यात दाखवण्यासाठी त्या कॅसेट आणि व्हीसीआरबरोबर आमच्या टीव्हीने संपूर्ण तालुक्यात कित्येकदा प्रवास केला.’

बातम्या आणखी आहेत...