आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाचा 8 डिसेंबरला समारोप:काशीपीठाचे जगद्गुरू उपस्थिती राहणार

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा गुरुवारी 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.15 वाजता समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला पंच पीठांपैकी एक पीठ असलेल्या काशीपीठाचे 87 वे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. नागपुरातील रेशीमबाग येथे आयोजित या कार्यक्रमात सरसंघचालक मार्गदर्शन करणार आहेत.

संघाच्या प्रचार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी 14 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान दुसऱ्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे एकाच वर्षात दोनदा संघ शिक्षा वर्गाचे आयोजन 1951 नंतर पहिल्यांदाच होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तृतीय वर्ष वर्ग महत्वपूर्ण मानला जातो. संघात 1927 मध्ये नागपूरच्या मोहितेवाडा येथे पहिल्यांदा संघ शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे याचवर्षी मे महिन्यात तृतीय वर्ष संघशिक्षा वर्ग पार पडले होते. त्यावेळी एकूण 735 शिक्षार्थी सहभागी झाले होते. कोरोनामुळे गेली 2 वर्षे या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन झाले नाही. त्यामुळे मे महिन्यात झालेल्या शिबिरासाठी इच्छुक शिक्षार्थींची संख्या फार मोठी होती. एकाच शिबिरात सर्वांना सामावून घेणे शक्य नसल्याने पुन्हा एका शिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. तेलंगणा येथील प्रांत संघचालक दक्षिणामूर्ती हे या शिबिराचे सर्वाधिकारी आहेत. यात सुमारे साडेसहाशे स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले आहेत.

नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित या कार्यक्रमात पंच पीठांपैकी एक पीठ असलेल्या काशीपीठाच्या ज्ञानसिंहासनावर उत्तराधिकारी आणि 87 वे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी उपस्थित स्वयंसेवकांचे मार्गदर्शन करतील असे संघाच्या प्रचार विभागाने स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...