आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रातरागिणी वर्षपूर्ती:डर के आगे जीत है... हे लक्षात ठेवा आणि समाजामध्ये आत्मविश्वासाने वावरा

नागपूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भीती प्रत्येकाच्या मनात असते. कोणाला पाण्याची भीती असते, कोणाला प्रवासाची तर कोणाला आणखी कशाची. भीती नसलेला माणूस शोधून सापडणार नाही. मला माझ्या बुटकेपणाची भीती होती. एकाॅन्ड्रोप्लेसिया म्हणजे बुटकेपणाच्या आजारामुळे माझी उंची वाढू शकणार नव्हती. पण, प्रत्येक भीतीवर मात करता येते. तशी मीही केली. मनातील भीतीवर मात केलेली जगातील सर्वात ठेंगणी मुलगी ज्योती आमगेचे अनुभव तिच्या शब्दांत…

न वाढलेल्या उंचीमुळे कधी काळी टिंगलटवाळीचा विषय असलेली मी आज त्याच उंचीमुळे सेलिब्रिटी झाले आहे. मी सोडून घरचे सगळे छान उंच असताना माझी वाढ खुंटली. एखादे बोन्साय झाडच म्हणा ना. घरचे सोडले तर सगळेच सुरुवातीला चिडवायचे. ‘बुटकबैंगण’ म्हणत टिंगलटवाळी करायचे. त्यामुळे बुटकेपणाच्या भीतीने मनात घर केले. कुठे बाहेर जायलाही मन धजावत नव्हते. पण आईबाबांसह घरच्यांनी खूप धीर दिला. मग मीही मन खंबीर केले. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत सगळीकडे जायला लागले. आपल्या बुटकेपणालाच आपली ताकद बनवायचे ठरवले. सर्वप्रथम नकारात्मक विचारांना बांध घातला. शाळेत फॅशन शोसह सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायला लागले. हळूहळू लोक स्वीकारायला लागले. त्यातून आत्मविश्वास मिळत गेला. आज माझ्या उंचीमुळे जगभर फिरले. माझ्या उंचीमुळे आज लोक माझ्यासाठी पायघड्या घालतात…माझ्यासोबत सेल्फी काढतात, मी जाईन तिथे कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकतात…हे सर्व माझ्या उंचीमुळे आहे. माझ्या बुटकेपणामुळे आज मी सेलिब्रिटीची उंची गाठली आहे…

अमेरिकेच्या फ्रिक शोमध्ये केले काम
माझी उंची २४ इंच म्हणजे २ फूट ०.६ इंच इतकी आहे. जगातील सर्वात बुटकी महिला हा िवश्वविक्रम माझ्या नावावर आहे. हा विक्रम माझ्या नावाने झाला त्या वेळी माझी उंची ६१.९५ सेंटिमीटर इतकी होती. १६ नोव्हेंबर २०११ रोजी वयाच्या १८ व्या वर्षी माझ्या नावाने विश्वविक्रम झाला. बिगबाॅस सीझन-६ तसेच अमेरिकेच्या हाॅरर स्टोरीचा चौथा सीझन फ्रिक शोमध्ये मी काम केले आहे. आज जगभरातून निमंत्रणे येतात. जनजागृतीच्या अनेक उपक्रमात माझा सहभाग असतो. कोरोनाकाळात घरी राहा, सुरक्षित राहाचा संदेश दिला. ज्योती उच्चशिक्षित असून तिने इंग्रजी साहित्यात एमए केले आहे.

आपल्या वैगुण्यावर निराश होऊ नका. प्रत्येकात काही ना काही वैशिष्ट्य असते. त्याचा शोध घ्या. आपल्यातील उणिवांवर वा भीतीवर मात करीत पुढे जा. सुरुवातीला तुमची हेटाळणी करणारे हेच जग तुम्हाला सलाम करील. शेवटी ‘डर के आगे जीत है’ हे लक्षात ठेवा आणि आत्मविश्वासाने वावरा. यश तुमचे आहे. - ज्योती आमगे

शब्दांकन : अतुल पेठकर

बातम्या आणखी आहेत...