आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादन:तांदळाच्या भंडाऱ्यात केळीचे विक्रमी उत्पादन

प्रशांत देसाई | भंडारा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धान उत्पादक भंडारा जिल्ह्यात केळीचे उत्पादन आणि तेही विक्रमी... ऐकून विश्वास बसत नाही ना!! मात्र, हे खरे आहे. अवघ्या राज्यात भंडारा हा जिल्हा तांदूळ (भात) पिकासाठी प्रसिद्ध आहे. किंबहुना येथील उच्च प्रतीच्या तांदळाला भारतातच नव्हे तर, परदेशातही मोठी मागणी आहे. अशा भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील कोलारी (पट) येथील शेतकरी मोरेश्वर सिंगनजुडे यांनी पारंपरिक भात पिकाची शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत बागायती शेतीतून केळीचे विक्रमी उत्पादन घेत आर्थिक प्रगती साधली आहे. कोलारी येथील मोरेश्वर सिंगनजुडे यांच्याकडे वडिलोपार्जित ८ एकर शेती आहे. या शेतीत ते पारंपरिक भात पिकाची शेती करायचे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि व्यापारी यांच्या चक्रव्यूहात सापडल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. यामुळे मोरेश्वर सिंगनजुडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती कसली. त्यांनी सुरुवातीला २ एकरात प्रायोगिक तत्त्वावर केळीची लागवड केली. त्यात त्यांना मोठा आर्थिक लाभ झाल्याने त्यांनी आता ६ एकरात केळीची लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. बागायती शेतीला जोड म्हणून त्यांनी आंतरपीक घेतले असून, पिकाला लागणारा खर्च त्यातून निघतो. त्यामुळे केळीचा शुद्ध नफा त्यांना एकरी ३ तर कधी दर वाढले तर ४ लाखांच्या घरात मिळत आहे. हा नफा म्हणजे धान पिकाला मिळणाऱ्या नफ्यापेक्षा सुमारे ४ पट अधिक आहे.

एकरी चारपट अधिक उत्पादन ^भात पीक घेताना एकरी नफा ४० हजार रुपये मिळत होता. त्यात व्यापारी आर्थिक लूट करत असल्याने पारंपरिक भात पिकाला फाटा देत केळीची लागवड केली. यासोबत आंतरपीक म्हणून पपई, टरबूज आणि ढेमसे लावले असून यातून आधुनिकतेची सांगड घालत आर्थिक प्रगती साधली आहे. या बागायतीतून चारपट अधिक उत्पादन मिळाले आहे. - मोरेश्वर सिंगनजुडे, शेतकरी.

बातम्या आणखी आहेत...