आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ:भाजपच्या कार्यक्रमात शिवरायांचा अपमान करणारा नेता सुधांशू त्रिवेदी पहिल्या रांगेत, रोहित पवारांचा संताप

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूरमध्ये सावरकर यात्रेच्या समारोपावेळी झालेल्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी भाजप नेते सुधांशू त्रिवेदी बसले होते. यावरून आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे. सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो, हाच संदेश दिला, असा टोला पवारांनी लगावला आहे.

सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. आणि आता याच सुधांशू त्रिवेदींना भाजपच्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत स्थान देण्यात येते. यावरून विरोधकांनी भाजपला सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ

रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भाजपचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संतापजनक वक्तव्य केले तेव्हा भाजपाने त्याचा एका ब्र शब्दानेही निषेध केला नाही. ना राज्यात छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढली. पण याच भाजपाने आज नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रेत महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले.

महाराष्ट्र द्रोही

रोहित पवार पुढे म्हणाले, ‘महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो, हाच संदेश भाजपने दिला आहे. शिवरायांना आराध्य दैवत मानणारा महाराष्ट्र भाजपची ही चाल कधीच विसरणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपला खडसावले आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांबाबत अवमानकारक वक्तव्य करणारा प्रत्येकजण आमच्यासाठी महाराष्ट्र द्रोहीच!

एका हिंदी वृतवाहिनीचा चर्चासत्रात बोलताना सुधांशू त्रिवेदी म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील औरंगजेबाची पाच वेळा पत्र लिहून माफी मागितली होती. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी त्रिवेदी यांचा निषेध नोंदवला होता. आता भाजपच्या कार्यक्रमात त्रिवेदी दिसून आल्याने विरोधकांनी भाजपला निशाण्यावर घेतले आहे.