आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच प्रकरण:'त्या' मोटार वाहन निरीक्षक साथीदारांसह अजूनही पसार, नागपूर व सोलापूर येथील निवासस्थानांची झडती

नागपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामटेकमधील कांद्री येथील आरटीओच्या चेकपोस्ट परिसरात चारशे रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता भास्कर शेजवळ दोन साथीदारांसह अद्यापही पसार आहेत.

एका ट्रकचालकाकडून मुकुंद व राजेश याने शेजवळांसाठी शुक्रवार ५ मे रोजी लाच घेतली होती. एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर शेजवळांसह तिघेही पसार झाले. शेजवळ तसेच मुकुंद सोनकुसरे व राजेश भातखोरे या तिघांचा अद्यापही एसीबीला शोध लागलेला नाही.

याबाबत अमरावती व नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांची चार पथके फरार शेजवळांसह तिघांचा शोध घेत आहेत. शेजवळ यांनी मध्यस्थाच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान पथकांनी नागपूर व सोलापूर येथील निवासस्थानांची झडती घेतली. झडतीत एसीबीच्या पथकालाही काहीही आढळून आले नसल्याची माहिती आहे.

ट्रक पासिंगसाठी चालकांकडून रक्कम उकळली जात असल्याची तक्रार लातूर जिल्ह्यातील चाकोट तालुक्यातील रहिवासी असलेला ट्रकचालक विकास केदार (वय २४) याने गुरुवार ४ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या डीजी कार्यालयात दिली होती. त्याआधारे त्याच रात्री सापळा रचण्यात आला. योजनेनुसार लाचलुचपत विभागाकडून एका ट्रकचालकाला पाठविण्यात आले. शेजवळ यांनी तडजोडीअंती ४०० रुपयांची लाचेची रक्कम त्यांच्या हस्तकांमार्फत स्वीकारली होती. त्यानंतर शेजवळ व त्यांचे दोन साथीदार फरार झाले होते.