आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्द पाळला:सचिन तेंडुलकरने वाटल्या ताडोबा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग; मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण

ताडोबाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न सचिन तेंडुलकर पाचव्यांदा सपत्नीक जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला आहे. मागील खेपेस त्याने आपल्या राहत्या रिसॉर्टशेजारी असलेल्या अलिझंजा या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार त्याने पत्नी अंजलीसह या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना स्कूलबॅग वितरीत केल्या.

सचिनला ताडोबातील जुनाबाई वाघिणीने भुरळ घातली असून, तो तिच्या दर्शनासाठी पुन्हा एकदा ताडोबात दाखल झालाय. त्यांनी कोलारा प्रवेशद्वारावरून ताडोबात सफारी केली असून, त्यादरम्यान त्याला छोटी तारा वाघीण, अस्वल व रानगवे यांचे दर्शन झाल्याची माहिती आहे.

यादरम्यान ताडोबातील प्राणीविश्व व इथल्या सुविधांबाबत सचिन व पत्नी अंजली यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, सचिनने मागच्या भेटीवेळी जो शब्द दिला, त्यावर कायम राहत तो जिल्हा परिषद शाळेत सपत्नीक उपस्थित झाला.

सचिन येणार असल्याची माहिती मिळताच शाळेत उत्साहाला उधाण आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर भव्य रांगोळी साकारत सचिनचे स्वागत करण्यास शिक्षक आणि विद्यार्थी सज्ज झाले होते. आणि तो क्षण आला. शाळेतील एका वर्गखोलीत सचिन आणि अंजली यांचे स्वागत करण्यात आले. अतिशय सध्या पद्धतीने हा सगळा सोहळा आयोजित होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधत सचिनने विद्यार्थ्यांना स्वहस्ते स्कुल बॅग भेट दिल्या. या भेटीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.