आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्धात आजपासून सुरू झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला गालबोट लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उभे राहिले, तेव्हा जोरदार गोंधळ झाला. महिलांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्याही भाषणावेळी घोषणाबाजी करत आंदोलन केले.
साहित्य संमेलन आणि वाद याचे नाते तसे जुनेच आहे. वर्धा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीवरूनही वादाचे सूर उमटले होते. मात्र, थेट संमेलनाच्या उदघाटनावेळी अचानक हा प्रकार घडल्याचे समोर आले. यामुळे संमेलनस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांना सर्व मार्ग बंद करावे लागले.
मुख्यमंत्री उभे राहिले अन्...
वर्ध्यात होणाऱ्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, प्रसिद्धी हिंदी कवी डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास उपस्थित होते. साहित्य संमेलनाचे उदघाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाले. तेव्हा विदर्भवाद्यांनी पत्रके फेकून वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांना फरफटत बाहेर नेले.
पण ते आक्रमकच...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार सर्वांचे म्हणणे ऐकणारे आहे. तुमचेही म्हणने ऐकू, असे आश्वासन देत भाषण सुरू केले. तेव्हा पुन्हा काही विदर्भवादी उभे राहिले. त्यांनी "शेतकऱ्यांवर बोला, वेगळ्या विदर्भावर बोला', असे आवाहन केले. तसेच 'वेगळा विदर्भ द्या' अशी मागणी करत पत्रके व्यासपीठाच्या दिशेने फेकली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाहेर नेले. त्यानंतर आणखी काही जणांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे मांडवात गोंधळ उडाला.
चपळगावकरांच्या भाषणात व्यत्यय
96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी उदघाटन कार्यक्रमात भाषण सुरू केले. तेव्हा एका महिलेने वेगळ्या विदर्भाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच व्यासपीठाच्या दिशेने पत्रके भिरकावली. मात्र, यामुळे पुन्हा गोंधळ निर्माण झाला. शेवटी पोलिसांनी मंडपाकडे येणारे सर्व मार्ग बंद केले. या महिलेलाही मांडवाबाहेर नेले. तेव्हा वृत्तवाहिन्यांचे माइक आणि कॅमेऱ्यासमोरही त्यांनी घोषणाबाजी केली.
रविवारी समारोप
संमेलनाचा समारोप रविवार, 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, दत्ताजी मेघे, संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांची उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे संमेलनाचे उदघाटन आणि समारोपाला राजकीय नेत्यांची नावेच जास्त आहेत. त्याची चर्चा सुरू झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.