आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात वाळू तस्करीसाठी लाच:अवैध रेती वाहतूक करण्यासाठी घेतली लाच, पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या हद्दीतून अवैध रेती वाहतूक करायची असेल तर 75 हजार रूपयाची लाच द्यावी लागेल अशी मागणी करीत त्यापैकी 45 हजार रूपये स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली असून जिल्ह्यातील रेती चोरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील तक्रारदार यांच्याकडे स्वतःचा 16 चाकी ट्रक असून ते माल वाहतुकीचा व्यवसाय करतात. 26 ऑगस्ट रोजी बेला पोलिसांनी तक्रारदार यांचा रेतीचा ट्रक पकडलेला होता. त्यावेळी बेल्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पुंडलीक सपाटे (वय 57) यांनी आपल्या हद्दीतून वाहतूक करण्याकरिता त्येकी वाहनाचे 15 हजार प्रमाणे एकूण 5 वाहनाचे 75 हजार रूपये महिन्याला देण्याची मागणी करून तडजोडीअंती 45 हजार स्वीकारले. तक्रारदाराने याची तक्रार एसीबीला दिलेली असल्याने त्यांनी सापळा रचून सपाटे यांना रंगेहाथ पकडले.

नागपूर जिल्ह्यात रेती चोरी आणि वाहतूकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामीण भागात अनेकजण यात गुंतलेले आहेत. मध्य प्रदेशातून मिळणाऱ्या बोगस ट्रांझिट पासवर नागपूर जिल्ह्यातील घाटांवरील रेती चोरणारे एक मोठे आंतरराज्यीय रॅकेट सक्रिय आहे. हा बोगस पास मिळवून देणाऱ्या राहुल खन्ना नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी जानेवारीत अटक केली होती.

नागपूर आणि विदर्भातील रेती घाटांवरील चोरी हे नवे प्रकरण नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेती चोरी होते. त्यावर महसूल आणि पोलिस विभागातर्फे कारवाईसुद्धा केली जाते. तरीही जिल्ह्यातील रेती माफियाचे नेटवर्क तगडे असून रेती चोरी होतच असल्याचे दिसून आले आहे. यात सावनेर, कुही, कन्हान या भागांचा प्रामुख्याने समावेश आहे. जिल्ह्यातील अनेकजण अवैध रेती व्यापाऱ्यात आहेत.

जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील रेती चोरी रोखण्यासाठी सुमारे 45 ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश दिले आहे. पोलिस आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...