आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या ईडीच्या कारवायांवरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेले आहे. केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर करण्यात होत असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात पोलिसांकडून भाजप नेत्यांतवर सुडातून कारवाई होत असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. यातच शिवसेना खासदार आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ईडीच्या धाडसत्रावरून केंद्र सरकारवर टीका केली. 'मला भिती वाटते की आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल, त्याच्यावर सुद्धा ईडी कारवाई करेल', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत सध्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने नागपूर दौऱ्यावर असून तिथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली.
ईडी आणि राज्यपाल जिथे भाजपाचं सरकार नाही, तिथेच कारवाया करतात. केंद्रीय तपास यंत्रणा सूडाच्या भावनेने तपास करत आहेत. पण, महाराष्ट्र गृहमंत्रालयाकडून असे कधीच करण्यात येणार नाही. कारण, महाराष्ट्र गृहमंत्रालयाला एक परंपरा आहे. ते त्यानुसारच काम करतील. राज्यात सुडातून कारवाई होत असल्याचे विरोधक बोंबलत आहे. आम्हाला सुडाच्या कारवाया करायच्या असतील तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. आम्हाला त्याची आवश्यकता नाही, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
जनतेची खरी समस्या कश्मीर फाईल्स नव्हे तर महागाईच!
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी महागाईवरून केंद्र सरकारवर टीका केली. तेलाच्या किंमती वाढत आहे. काल संसदेत महागाईवर चर्चा झाली. आता निवडणूका संपल्यानेच इंधनाचे दर वाढवले आहेत. हेच भाजपचे धोरण आहे. पूर्ण देशात महागाईविरोधात वातावरण तयार झालं आहे. देशात खरी समस्या काश्मीर फाईल्स, हिजाब, रशिया युक्रेन नसून महागाई आहे, असे राऊत म्हणाले.
विरोधकांवर दबाव टाकण्यासाठीच कारवाया!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई सुरूच आहे. यावर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात आशा कारवाया सुरू आहेत. पश्चिम बंगालमध्येदेखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाचा अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस गेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तुम्हाला झुकवू शकतो, नमवू शकतो हे विरोधकांना दाखवून देण्यासाठी करण्यात येत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.