आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंदीया जिल्ह्यात 34 सारस आढळले:भंडाऱ्यात आढळली सारस पक्ष्याची नवीन जोडी! येत्या जूनमध्ये होईल नव्याने गणना

नागपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जून २०२२ मध्ये झालेल्या सारस पक्षी गणनेत भंडारा जिल्ह्यात सारस पक्ष्याची एक जोडी व एक बच्चा असे तीन सारस आढळले होते. आता नव्याने एक जोडी व दोन बच्चे आढळले आहे. यामुळे पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जून २०२२ मधील सारस गणनेत गोंदीया जिल्ह्यात ३४ सारस आढळले होते. विष प्रयोग, इलेक्ट्रिक शाॅक आदीमुळे त्यातील चार पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. आता एकूण ३४ सारस आहे.

गोंदिया येथील सेवा संस्थेमार्फत सारस गणना केली जाते. या संस्थेचे सावन बाहेकर यांच्याशी संपर्क साधला असता भंडारा जिल्ह्यात आढळलेल्या बच्च्याने नवी जोडी तयार केली असावी किंवा नव्याने नव्या जोडीची नोंद झालेली असावी अशी शक्यता वर्तवली. येत्या जूनमध्ये सारस गणना होणार असून त्यात किती नोंद होते त्यावर लक्ष ठेवावे लागेल असे सावन बाहेकर म्हणाले.

११ जून २०२२ रोजी मध्य प्रदेशातील बालाघाट व रविवार १२ जून २०२२ रोजी गोंदीया व भंडारा जिल्ह्यात सारस गणना करण्यात आली. त्याची आकडेवारी पक्षी प्रेमींची चिंता वाढवणारी होती. या गणनेत गोंदीया जिल्ह्यांत ३४, भंडारा जिल्ह्यांत ३ व मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यांत ४५ सारस आढळून आले होते.

गेल्या काही वर्षात गोंदिया येथील सेवा संस्थेमार्फत गोंदिया, बालाघाट या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे काम झाले. अलिकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर वनखातेही पुढाकार घेऊ लागले आहे. त्या नंतरही संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी २०२० मध्ये महाराष्ट्रात ४४ तर बालाघाटमध्ये ५२ सारस पक्षी आढळून आले होते. या ४४ मध्ये ४२ गोंदीयात आणि ०२ भंडाऱ्यात आढळले होते. तर २०२१ मध्ये गोंदीयात ३५ ते ३९, भंडाऱ्यात ०२, आणि बालाघाटमध्ये ४८ सारस आढळून आले होते. पहाटे ५ ते १० या वेळेत पारंपरिक व शास्रीय अशा दोन्ही पद्धतीने गणना करण्यात आली होती. गणनेत पक्षीप्रेमी, शेतकरी व वनिवभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

पावसाळ्यात सेवा संस्था आणि वन विभाग सारस पक्ष्याच्या अधिवास असलेल्या ठिकाणी सारस पक्ष्यांची घरटे शोधण्यासाठी कठीण परिश्रम करतात आणि त्या घरट्यांतून सारस पक्ष्यांचे पिल्लू तयार होऊन उडण्यापर्यंत सारस पक्ष्याची काळजी घेतात. या भागातील २०२१ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील ६ सारस आणि बालाघाट जिल्ह्यातील ४ सारसचे पिल्लू तयार होऊन नव्या जागेच्या शोधात निघाले होते.