आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावित्रीबाई फुले जयंती विशेष:विज्ञानाची गोडी लागावी म्हणून भांडारगृहात प्रयोगशाळा

नागपूर4 महिन्यांपूर्वीलेखक: अतुल पेठकर
  • कॉपी लिंक
  • नागपूर मनपा शाळेतील विज्ञान शिक्षिका बिश्त यांचा प्रयोग

आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेली श्रीमंतांची मुले अद्ययावत सोयीसुविधा असलेल्या खासगी शाळेत शिकतात. पण, महापालिका शाळेत शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजाकडून दुर्लक्षित मुला-मुलींना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून नागपूर महापालिका शाळेतील विज्ञान शिक्षिका दीप्ती बिश्त यांनी २५ वर्षांपूर्वी चक्क भांडारगृहाची खोली स्वच्छ करून तिथे विज्ञानाची प्रयोगशाळा सुरू केली. आज तिथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभी आहे. मुलींना आपल्या घरी ठेवून आणि पदरचे पैसे खर्च करून विज्ञानाचे प्रयोग रुजवणाऱ्या दीप्ती बिश्त यांचे प्रयत्न आता सुफल संपन्न झाले आहेत.

साधारणत: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुले शिकतात. अभाव आणि प्रतिकूलता तिथे पाचवीलाच पुजलेली असते. अशा महापालिकेच्या सुरेंद्रगड माध्यमिक हिंदी शाळेत दीप्ती बिश्त १९९७ मध्ये या पहिल्या विज्ञान शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. तोपर्यंत इतर शिक्षक जमेल तसे विज्ञान शिकवत होते. विज्ञानात प्रयोग करायचे असतात, त्यासाठी प्रतिकृती वगैरे तयार करायच्या असतात, हे मुलांच्या गावीही नव्हते.

बिश्त यांनी भांडारगृहाची खोली स्वच्छ करून तिथे प्रयोगशाळा सुरू केली. त्यांनी मुलांना प्रयोगशील आणि कृतिशील विज्ञानाची गोडी लावण्यासाठी पाण्याच्या प्लास्टिक बाॅटल्स, रिफिल, कागद, पेन्सिलपासून साहित्य निर्मिती केली. हळूहळू मुलांमध्ये आवड निर्माण झाली. त्यांची धडपड सार्थकी लागली. कधी नव्हे ते प्रयत्नांची दखल घेत महापालिका प्रशासनाने मदत केली. त्यातून आजची सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभी राहिली.

मुलांना त्यांनी पर्यावरणाची गोडी लावली. नागपुरातील गणेशोत्सवात शाळेच्या मुला-मुलींची ‘ग्रीन आर्मी’ तयार करत सर्वप्रथम निर्माल्य संकलन सुरू केले. २००७-०८ मध्ये सर्वप्रथम पर्यावरणपूरक अष्टविनायक तयार केले. त्यांच्या मार्गदर्शनात मुलांनी तयार केलेला तारा मंडळाचा प्रयोग खूप गाजला. छत्रीत उदबत्त्या टोचून आणि त्यात छोटे बल्ब लावून मुलांनी तारा मंडळ तयार केले. संपूर्ण देशातील सुमारे ४ लाख विज्ञान शिक्षकांचा समन्वय असलेल्या व्हाॅट‌्सअॅप ग्रुपच्या त्या महाराष्ट्र समन्वयक आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाॅकडाऊनमध्ये मुलामुलींचा अभ्यास बुडू नये म्हणून स्वत:ची यूट्यूब वाहिनी व चेहरे पुस्तिका पान (फेसबुक पेज) सुरू केले. त्यांची मुले ६ वेळा राष्ट्रीय आणि ३ वेळा राज्य स्तरावर स्पर्धेत सहभागी झाली. स्वत: बिश्त यांनी मलेशिया व श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केले. इयत्ता सहावी ते दहावीसाठी विज्ञान आणि प्रौद्योगिकी विषयावरील अभ्यासक्रम तयार करण्यासाठी स्थापन अभ्यास मंडळावर त्या सदस्य आहेत. इंडिया इंटरनॅशनल या विज्ञान शिक्षकांच्या महाकुंभात दोनदा मुलांनी प्रतिनिधित्व केले आहे. एक शिक्षक आणि तीन मुलांवरून सुरू झालेला प्रवास दहा खोल्या आणि २०० मुला-मुलींपर्यंत पोहोचला आहे. २०२० मधील १५ आॅगस्ट व शिक्षकदिनी त्यांनी दिलेला संदेश १० लाख लाेकांनी बघितला.

बातम्या आणखी आहेत...