आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारने पहिल्या वर्गापासून चौथी आणि सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 1 डिसेंबरपासूनच लागू केला. परंतु, मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये अद्याप याबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यातच आता नागपूर आणि औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय आणखी लांबणीवर टाकला आहे.
आता 15 डिसेंबरनंतर निर्णय
औरंगाबादेत पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरनंतर घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. आता हा निर्णय 15 डिसेंबरनंतर घेतला जाईल अशी माहिती महानगरपालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी शुक्रवारी दिली आहे. यासोबतच, नागपुरात सुद्धा 10 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाणार अशी माहिती देण्यात आली होती. परंतु, नागपुरात सुद्धा 15 डिसेंबरपर्यंत हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली आहे.
मुंबई आणि पुण्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय सुद्धा 15 डिसेंबर नंतर घेतला जाणार आहे असे आधीच स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे. मात्र, 15 डिसेंबरला यासाठी एक बैठक घेतली जाईल. कोरोना आणि या व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनवर एक आढावा घेतला जाईल. त्यानंतरच पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो.
शाळांबाबत काय म्हणाले आरोग्य मंत्री?
कोरोना व्हायरस आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनपासून जवळपास 2 वर्षे पहिलीपासूनच्या शाळा बंदच आहेत. राज्य सरकारने पहिलीपासून शाळा सुरू करण्यास मंजुरी देणारे पत्रक काढले असले तरीही त्याची अंमलबजावणी स्थानिक प्रशासनावर सोपविली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना नुकताच शाळांबद्दलचा एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, ज्या ठिकाणी शाळा सुरू झालेल्या नाहीत त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू कराव्या असे टोपे यांनी सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.