आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा:आदिवासी भागातील मुलांसाठी लवकरच स्वतंत्र क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणार

प्रतिनिधी/नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी भागातील मुला-मुलींमधील क्रीडाकौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने भविष्यात आदिवासींसाठी खासदार क्रीडा महोत्‍सवाच्‍या धर्तीवर स्वतंत्र क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

आदिवासीबहुल भागात मुलभूत सोयीसुविधांचा विकास करण्याचे काम सुरू आहे. नक्षलवादामुळे आजवर मागास राहिलेल्या क्षेत्रात आता शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.

क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

एकल अभियान ग्राम स्वराज मंच योजनेच्या एकल अभ्युदय युथ क्लबच्या एकल ग्राम संगटन, वनबंधू परिषद व श्री हरी सत्संग समितीच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे झालेल्या कार्यक्रमाला एकल अभियानचे राष्ट्रीय महामंत्री माधवेंद्र सिंह, सामाजिक कार्यकर्ते निखिल मुंडले, आदिवासी विकास आयुक्त रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.

सामाजिक संघटनांनी सहकार्य करावे

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्रीय स्तरावर एकल अभियान तर विदर्भ स्तरावर मानकर ट्रस्ट अंतर्गत एकलव्य एकल विद्यालयांच्या मार्फत ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य, सेवा आणि विकास या क्षेत्रात काम सुरू आहे. आदिवासी आणि अनुसूचित जाती समाजात सिकलसेल आणि थॅलेसिमिया या रोगाचा प्रभाव आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनासोबत सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

ग्रामीण खेळाडूंना फायदा

माधवेंद्र सिंह यांनी एकल अभियान ग्रामीण व वनवासी भागात शिक्षण प्रचार व प्रसाराचे काम करीत असल्‍याचे सांगितले. भारतातील ग्रामीण भागात संधी कमी असून आणि मोठ्या शहरात सराव करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडत नाही. म्हणून एकल अभियानाने हा क्रीडा उपक्रम सुरू केला आहे. एकल विद्यालये गावागावातील खेळाची नर्सरी असून त्यातून खेळाडू तयार केले जातील. हे खेळाडू देशासाठी खेळतील, असे ते म्‍हणाले.

क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

भारतमातेला वंदन करुन क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला. किशोर हेकडे यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन करण्यात आले. परतवाडा, गोंदिया, पांढरकवडा, किनवट, आम्रपाली, नाशिक, घोटी, वाडा, शहादा, नारायणगाव क्षेत्रातून बाल-बालिका खेळाडूंनी पथसंचलन केले. उद्घाटन सत्रानंतर आकाशात रंगबेरंगी फुगे ऊडवून स्पर्धांना सुरूवात करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...