आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सात वर्षांनंतर फुप्फुसातील लवंग काढली बाहेर, श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी केले उपचार

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

३६ वर्षीय अनुषा यांना गेल्या दोन-तीन वर्षांपासून खोकल्याचा त्रास होता. गेल्या दोन-तीन महिन्यांत हा त्रास फारच वाढला. सोबत खोकल्याद्वारे दम लागणे, वजन कमी होणे, छातीमध्ये दुखणे व अधुनमधून थुंकीत रक्त येणे अशी लक्षणेही त्यांना होती. त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला दाखवले. इंदूर येथील डॉक्टरांनी छातीचा सीटी स्कॅन करून कर्करोगाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, नागपुरातील प्रसिद्ध श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी कर्करोग नसून काहीतरी अडकले असल्याचे निदान केले. त्यावर ब्रोन्कोस्कोपिक क्रायो बायप्सी, डायलेटेशन (फुगा) आणि फॉरेन बॉडी रिमुव्हल अशा प्रक्रिया करून तब्बल सात वर्षांपूर्वी अडकलेली लवंग बाहेर काढली. या प्रक्रियेसाठी कुठलीही चिरफाड करावी लागली नाही. तोंडाद्वारे फुप्फुसांमध्ये दुर्बिन (ब्राँकोस्कोप) घालून पूर्ण प्रक्रिया करण्यात आली. एकूणच यामुळे कर्करोगाची शक्यता व्यक्त केल्यानंतर जेव्हा लवंग निघाली तेव्हा अनुषा यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

काही दिवसांपासून त्रास वाढल्याने तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू केला. मात्र, त्यानंतरही बरे न वाटल्याने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यामध्ये डाव्या फुप्फुसाच्या खालील भागात गाठ व न्यूमोनिया यांचे निदान झाले. ही गाठ कर्करोगाची असू शकते, अशी शक्यता तेथील डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने ब्राँकोस्कोपी करून बायस्पी घेण्यात आली. या रिपोर्टमधून काही निष्पन्न न झाल्याने सीटी गायडेड बायोप्सीदेखील करण्यात आली. त्यामध्ये कुठलेही निदान होऊ शकले नाही. त्या दरम्यान स्थानिक डॉक्टरांनी कर्करोगाची शक्यता व्यक्त केली. पण नेमके निदान होत नव्हते. सोबतच खोकला व दम कमी होत नव्हता. हे सगळे करण्यात दोन महिने निघून गेले. घरातील परिस्थिती बदलून गेली होती. पतीच्या कामावर आणि शाळेत जाणाऱ्या मुलावरही त्याचा परिणाम झाला होता. मात्र, आता रुग्ण पूर्णपणे बरी झाली आहे.

श्वासनलिकेमध्ये केले डायलेटेशन
रुग्ण व त्यांच्या पतीशी चर्चेअंती असे लक्षात आले की, सात वर्षांपूर्वी गळ्यात काहीतरी अडकले होते. क्रायोबायोप्सीनंतर आतली सूज कमी झाल्यावर ब्राँकोस्कोपी करून तो भाग स्वच्छ केला. तेव्हा तेथे काहीतरी अडकल्याचे स्पष्ट झाले. श्वसनलिकेमध्ये (ब्राँकस) डायलेटेशन करून म्हणजे छोटा फुगा टाकत ती वाट मोकळी केली आणि लवंगाचा तुकडा बाहेर काढला. मात्र, डॉ. अशोक अरबट यांच्या मार्गदर्शनात श्वसन रोगतज्ज्ञ डॉ. स्वप्निल बाकमवार, डॉ. परिमल देशपांडे, डॉ. आशुतोष जयस्वाल यांनी हे आव्हान लिलया पेलले व प्रक्रिया यशस्वी केली.

बातम्या आणखी आहेत...