आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:पवारांचा विदर्भ दौरा अन् प्रादेशिक असमतोलाचे घोंगडे..; अचानक केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण

अतुल पेठकर | नागपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सरकार स्थापनेच्या दोन वर्षांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. नागपूरपासून या दौऱ्याची सुरुवात झाली. “जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं. और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूं’’ हा रावडी राठोडमधील डायलॉग खरे तर शरद पवारांना लागू होतो. त्यामुळे त्यांच्या मनाचा थांग नेमका कोणालाच लागत नाही. बोलताना पवारांनी केलेले प्रादेशिक असमतोलाविषयीचे वक्तव्य म्हणूनच चर्चेचा विषय झालेले आहे...

शरद पवार उगाच बोलायचे म्हणून बोलत नाहीत, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विदर्भ व मराठवाड्यात आले की, मुख्यमंत्र्यांची यादी सादर करत. मग यांनी काय केले, असा सवाल करत. पवारांनीही या वेळी तेच केले. विदर्भाचा निधी का पळवला जातो? विदर्भाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला यासंबंधी प्रश्न विचारले असता पवारांनी विदर्भातील मुख्यमंत्र्यांची नावे सांगत मग यांनी काय केले? हेच सूचित केले.

मुख्यमंत्र्यांवर संपूर्ण राज्याची जबाबदारी असली तरी ते येत असलेल्या प्रदेशाचा तुलनेने जास्त विकास होतो, असे सांगत पवारांनी पश्चिम महाराष्ट्राच्या भरीव विकासाचे समर्थन करत विदर्भाचे नेतृत्व विकासात कमी पडले, असे सूतोवाच केले. यामुळे प्रादेशिक असमतोलाची चर्चा नव्याने झाली.

विदर्भात वसंतराव नाईक (५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५), सुधाकरराव नाईक (२५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३), मारोतराव कन्नमवार (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईकांनंतर तब्बल १६ वर्षांनंतर सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांना उणीपुरी दोन वर्षे मिळाली.

त्यानंतर तब्बल २१ वर्षांनंतर ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मराठवाड्याच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. तिथे शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख दोनदा तर शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि अशोक चव्हाण यांना एकदा संधी मिळाली.

पण, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत पाहिले विदर्भाला सलग मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीमुळे नेहमीच समृद्धी राहिली. तर विदर्भ आणि मराठवाड्यात कायम विकासाचा अनुशेष राहिला. अनुशेष भरून काढणे हे काही वर्षांचे काम नाही.

स्वत: शरद पवार चारदा मुख्यमंत्री होते. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी सरकारने समदृष्टीने विकास करण्याची गरज आहे. पक्षाचे सरकार, पक्षाचा मुख्यमंत्री या मानसिकतेतून बाहेर पडत जनतेचे सरकार म्हणून काम करावे.

बातम्या आणखी आहेत...