आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयपूर, अमरावतीनंतर नागपुरातही दहशत:नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने कुटुंबाने राज्य सोडले, वारंवार धमक्यांमुळे अज्ञातवासात

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे उदयपूर येथे कन्हैयालाल आणि अमरावतीत उमेश कोल्हेंची हत्या झाली. आता नागपुरातही असाच प्रकार समोर येत आहे. नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे नागपुरातील एका कुटुंबाला राज्य सोडून पळावे लागले. पोस्टनंतर सतत धमक्या येत असल्याची तक्रारही या कुटुंबाने नंदनवन पोलिसांत दिली आहे.

जमाव चालून आला

पीडित कुटुंबातील एका सदस्याने याबाबत 'दिव्य मराठी'ला माहिती दिली. त्यानुसार नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने १४ जून रोजी इन्स्टाग्रामवर नूपुर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट टाकली होती. त्यानंतर मध्यरात्री १ वाजेपासून त्याला सतत धमकीचे फोन आणि मेसेज येऊ लागले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने पहाटे ४ वाजता नंदनवन पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर 2 दिवसांनी सुमारे १०० जणांचा जमाव तरुणाच्या घरावर चाल करून आला. परंतु, तरुणाच्या कुटुंबीयांना या घटनेची पूर्वीच चाहूल लागल्यामुळे तरुण आणि त्याचे कुटुंब परिसरातील एका हॉटेलमध्ये जाऊन लपले होते. हॉटेलमध्ये दोन दिवस वास्तव्य केल्यानंतर त्यांनी नागपूर सोडले. त्यानंतर आपल्या एका नातेवाईकाकडे काही दिवस मुक्काम केला. परंतु, धमक्यांचा ससेमिरा न थांबल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सोडून अज्ञात ठिकाणी वास्तव्य केले आहे.

क्षमायाचनेनंतरही धमक्या

नूपुर शर्माच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्या तरुणाचा मोठा भाऊ व्यवसायाच्या संदर्भात नागपूरला आला आहे. मात्र, त्याला लपतछपत वावरावे लागत आहे. यासंदर्भात त्याने सांगितले, कुठल्याही धर्माचा अपमान करणे हा आमचा हेतू नव्हता. माझा लहान भाऊ तरुण असून त्याने चुकून पोस्ट फॉरवर्ड केली होती. आमच्या कुटुंबाने त्याला ती पोस्ट डिलीट करायला लावली. तसेच, दुसरी पोस्ट अपलोड करून क्षमायाचना करायला लावले. परंतु, त्यानंतरही आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत.

पोलिसांनी कारवाई करावी

उदयपूर आणि अमरावतीच्या घटनांमुळे आमचे संपूर्ण कुटुंब घाबरलेले असून अज्ञात स्थळी लपून बसले आहे. तरीही पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप पीडित तरुणाच्या भावाने केला आहे. याप्रकरणी नंदनवन पोलिसांशी संपर्क साधला असता पीडित तरुणाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, हे प्रकरण आणि तपास याबाबत बोलण्यास पोलिसांनी नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...